नवी दिल्ली, वृत्तसंस्था । 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला तब्बल 29 वर्षांनी संयुक्त अरब अमिरातीमधून अटक करण्यात आली आहे. देशातील सर्वांत मोठा बॉम्बस्फोटात तब्बल 257 जणांचा मृत्यू झाला होता तर 700 हून अधिक जण जखमी झाले होते. या संदर्भातील वृत्त इंडिया टूडेने दिले आहे. अबू बकर पाकव्याप्त काश्मीरमध्ये शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचे प्रशिक्षण देत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मुंबई हल्ल्यात वापरण्यात आलेले आरडीएक्सचे लॅन्डिंग आणि दाऊबसोबत दुबईतून कट रचण्यात बकरचा हात असल्यामुळे भारतीय यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. अखेर 29 वर्षांनी अबू बकर भारतीय यंत्रणांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे.
भारतात आणण्याची शक्यता
अबू बकर हा दाऊद इब्राहिमचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. सन 1997 मध्ये अबू बकर याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. अबू बकरचे दुबईमधील अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांशी हितसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. सन 2019 मध्ये बकरला अटकही करण्यात आली होती. मात्र, काही कागदपत्रांच्या अडचणींमुळे तो यूएई अधिकार्यांच्या ताब्यातून सटकण्यात यशस्वी झाला होता. आता त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून, लवकरच भारतात आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
अबूच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया
दरम्यान, अबू बकर यांचे पूर्ण नाव अबू अब्दुल गफूर शेख आहे. दाऊदचे प्रमुख लेफ्टनंट मोहम्मद आणि मुस्तफा डोसा यांच्यासोबत अबू तस्करीत सामील होता. त्याने आखाती देशांमधून सोने, कपडे आणि इलेक्रॉनिक्स वस्तूंची तस्करी मुंबईत केल्याचा आरोप आहे. सध्या अबूच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु आहे.