जळगाव, प्रतिनिधी । वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत केलेली अरेरावी आणि उद्धट वर्तणूकी विरोधात महाराष्ट्रामध्ये आंदोलने तसेच निवेदने दिली जात आहेत. जळगावात देखील शुक्रवारी ४ फेब्रुवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्राध्यापकांनी सौरभ विजय यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांच्या वर्तणुकीचा निषेध करत निदर्शने केली. तसेच अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांना निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशन वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय यांना भेटण्यासाठी गुरुवारी ३ फेब्रुवारी रोजी गेले होते. त्यावेळी शिक्षक असोसिएशनच्या पदाधिकार्यांशी सौरभ विजय यांनी उद्धट व असभ्य वर्तणूक केली. त्यामुळे संतापलेल्या प्राध्यापकांनी राज्यभर आंदोलने सुरू केली आहेत.
काही ठिकाणी निषेध व्यक्त करून आंदोलने केली जात आहेत. त्याचे पडसाद जळगावात देखील शुक्रवारी ४ फेब्रुवारी रोजी उमटले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव मध्ये प्राध्यापकांनी संध्याकाळी एकत्र येऊन सौरभ विजय यांच्या गैरवर्तणूकीचा निषेध केला. तसेच “नही चलेगी, सौरभ विजय यांची दादागिरी नही चलेगी” अशा घोषणाबाजी देखील केल्या.
यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना देखील निवेदन देण्यात आले. प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. इमरान तेली, डॉ. विजय गायकवाड, डॉ. भाऊराव नाखले, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विलास मालकर, डॉ. संदीप पाटील, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. डॅनियल साजी, डॉ. संदीप सूर्यवंशी डॉ. हर्षल महाजन, डॉ.चेतन भंगाळे, डॉ. हणमंत मोरे, डॉ. बाळासाहेब सुरोसे उपस्थित होते.