मुंबई, वृत्तसंस्था । बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती अनेकदा विविध मुद्द्यांवर उघडपणे आपले मत मांडते. अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगनाला ट्रोलही केले जाते. नुकतंच कंगनाने केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल स्पष्टपणे मत व्यक्त केले आहे. कंगनाने सोशल मीडियाद्वारे संरक्षण मंत्रालयाच्या एका निर्णयाचे स्वागत करत त्याचे कौतुक केले.
भारत सरकारने भारतीय हवाई दलात महिला लढाऊ वैमानिकांचा समावेश करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरु असलेल्या पायलट योजनेचे कायमस्वरूपी योजनेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली. राजनाथ सिंह यांनी ही घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचे कौतुक केले.
यानंतर कंगना रणौतनेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या निर्णयाचे कौतुक केले आहे. भारतीय हवाई दलात महिला लढाऊ वैमानिकांची संख्या वाढवण्याच्या केंद्राच्या या निर्णयाचे तिने कौतुक केले आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर राजनाथ सिंह यांच्या ट्वीटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यासोबत ती म्हणाली, केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय क्रांतिकारी आहे. या निर्णयामुळे आता भारतीय हवाई दलात आणखी महिला लढाऊ वैमानिक पाहायला मिळतील.
दरम्यान, कंगना लवकरच ‘धाकड`, ‘तेजस` आणि ‘इमर्जन्सी` सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या शिवाय कंगना ‘मणिकर्णिका रिटर्न्स: द लिजेंड ऑफ दिड्डा` आणि ‘सीता- द इन्कारनेशन`मध्येही काम करणार आहे. यासोबतच कंगना ‘टिकू वेड्स शेरू` या आणखी एका चित्रपटाची निर्मिती करत आहे.