मुंबई, वृत्तसंस्था । काही दिवसांपूर्वीच परीक्षा ऑफलाईनच होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर आज विद्यार्थ्यी त्याविरोधात आक्रमक झाले आहेत. ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला असून ऑनलाईन परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी केली आहे. यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी घेराव घातला आहे. यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आहे.
सुरूवातील विद्यार्थ्यांना समजावण्याच प्रयत्न केला मात्र आक्रमक विद्यार्थी काही केल्या ऐकायला तयार नव्हते, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी जमलेल्या विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी पळापळ सुरू केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. पोलिसांच्या लाठीमारानंतर विद्यार्थी आणखी आक्रमक झाले आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा संपूर्ण परिसराचा चार्ज घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी मोठा फौजपाटा बोलवला.
या आंदोलनावरून भाजपने सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे, या राज्यात लोकशाही राहिलेली नाही, मनाला येईल तेव्हा लाठीमार, मनाला येईल तेव्हा जेलमध्ये टाकायचं, मनाला येईल तेव्हा गुन्हे दाखल करायचे, असा धंदा सरकारकडून सुरू असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहे. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचं पाप हे सरकार करतंय अशी टीका दरेकरांनी केली आहे. यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, असेही दरेकर म्हणाले आहे. परीक्षांच्या संदर्भात ज्या संस्थाची निवड केली त्या संस्थाचे काम बघा असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनीही महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. अशा सरकारकडून काय अपेक्षा करायच्या अशी कोपरखिळी सुधीर मुनगंटीवर यांनी मांडली आहे. महाराष्ट्र हे कुणाच्या नावावर असणारे राज्य नाही, खोट्या बहुमताच्या आधारे हे सरकार आलं आहे, आता तरी सरकारने डोकं ठिकाणावर आणावे, अशी टीका भाजपने केली आहे.