नवी दिल्ली । आजच्या आधुनिक युगात फेसबुक पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुकवर चॅटिंग आणि व्हिडीओ कॉलसाठी मेसेंजर अॅप वापरलं जातं. याच मेसेंजरमध्ये आणखी एक नवीन फीचर जोडण्यात आलंय. नव्या फीचरनुसार मेसेंजरवर केलेल्या चॅटिंगचा जर कोणी स्क्रीनशॉट घेत असेल, तर समोरच्या व्यक्तीला त्याबाबत नोटिफिकेशन पाठवलं जाईल.
याआधी, ‘व्हॅनिश मोड’ मध्ये ही सुविधा उपलब्ध होती. जेव्हा व्हॅनिश मोडमध्ये कोणतरी स्क्रीनशॉट घ्यायचं तेव्हा या अलर्ट सिस्टमच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला कळायचं. परंतु यापुढे सर्वच मोड आणि सर्व चॅटसाठी कंपनीने स्क्रीनशॉट नोटिफिकेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच फेसबुक मेसेंजरवरील सर्व चॅट्स ही एंड-टू-एंड एनक्रिप्टेड देखील आहेत.
एका पोस्टमध्ये, फेसबुक मेसेंजरची पॅरेंट कंपनी मेटाने म्हटलंय की, “तुम्ही एनक्रिप्टेड चॅट्स वापरण्यास सक्षम असावं आणि चॅटिंग करताना तुम्हाला सुरक्षित वाटावं, हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. म्हणून कोणी तुमच्या गायब झालेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट घेत असेल, तर त्याबद्दल तुम्हाला माहिती असावी, असं आम्हाला वाटतं.” याशिवाय एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड ग्रुप चॅट्स आणि मेसेंजरवर कॉल असे अनेक फीचर्स मेटाकडून आणण्यात आले आहेत. मेटाने आणखी अनेक फीचर्स आणली आहेत.
फेसबुक मेसेंजरवरील मेसेजवर इमोजीच्या माध्यमातून रिअॅक्ट होता येतं. या फीचरलादेखील गेल्या काही दिवसांत युजर्सकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे. मेसेजवर थोडा वेळ प्रेस केल्यास इमोजी ट्रे ओपन होतो. त्यातून तुम्ही आवडीच्या इमोजी वापरून रिअॅक्ट होऊ शकता. हे फीचर इन्स्टाग्राम डायरेक्ट मेसेजेसवर आधीपासूनच लाइव्ह आहे आणि या वर्षाच्या शेवटी व्हॉट्सअॅपवर येईल, असं म्हटलं जातंय. याशिवाय फेसबुक मेसेंजर युजरला विशिष्ट मेसेजला उत्तर देऊ देईल. अॅपवरील फीचर वापरण्यासाठी युजर मेसेजला जास्त वेळ दाबून स्वाइप करून रिप्लाय निवडू शकतात. हे फीचर मेटा-मालकीच्या व्हाट्सअँप आणि इंस्टाग्रामवर आधीपासून उपलब्ध आहे.
तसेच मेसेंजरला टायपिंग इंडिकेशन्स मिळत आहेत. हे पर्सनल आणि ग्रुप चॅटसाठी उपलब्ध आहे. मेटा मेसेंजरमध्ये मेसेज फॉरवर्ड करण्याचा ऑप्शन आणणार आहे. हे फीचर व्हॉट्सअॅपवर आधीपासूनच उपलब्ध आहे. अगदी काही क्लिकमध्ये युजर मेसेज आणि मीडिया फाईल्स फॉरवर्ड करू शकतील. दरम्यान, व्हाट्सअँप प्रमाणे मेसेंजरवर फॉरवर्ड केलेल्या मेसेजमध्ये वर ‘फॉरवर्ड’ लिहिलेलं असेल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
फेसबुक मेसेंजरवर आता युजर्सना व्हिडीओ पाठवण्यापूर्वी ते एडिट करण्याचं ऑप्शन देण्यात आलाय. याशिवाय ओरिजनल अकाउंट ओळखण्यासाठी व्हेरिफाईड बॅजसह सेव्ह मीडियासाठी ऑप्शन दिले गेले आहेत. मेटाने एका पोस्टमध्ये म्हटलंय की, “आम्ही मित्र आणि कुटुंबीयांसोबत तुमचे एनक्रिप्टेड चॅट सुधारत राहिल्यामुळे हे फीचर्स तुमचा प्रायव्हेट मेसेज अनुभव चांगला करतील, अशी आम्हाला आशा आहे. युजर्सनी या फीचर्सचा आनंद घेण्यासाठी अॅप अपडेट करून घेणं आवश्यक आहे.”