जळगाव, प्रतिनिधी । घराच्या बाहेर लावलेली ५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील विद्या नगर परिसरात राहणारे दिपक वासुदेव फालक (वय-३५) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे नोकरीवर जाण्यायेण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ एजे ११०१ ) क्रमांकाची दुचाकी आहे. २३ जानेवारी रोजी रविवार असल्याने ते घरीच होते. त्यांनी त्यांची दुचाकी घराच्या समोर पार्किंग करून लावली होती. दुपारी ४ ते सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांची ५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले.
परिसरात दुचाकीचा शोधाशोध केला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. शुक्रवार २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल पाटील करीत आहे