जळगाव प्रतिनिधी – मित्रांच्या खांद्यावर बसून नाचत असतानाच तलवारीने केक कापणाऱ्या ‘बड्डेबॉय’चा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी त्याला अटक केली
पंकज भानुदास चौधरी (वय २४) असे अटक केलेल्या ‘बड्डेबॉय’चे नाव आहे. २४ जानेवारी रोजी चौगुले प्लॉट भागात पंकजचा वाढदिवस साजरा झाला.
मित्रांनी डीजेच्या तालावर नृत्य करीत पंकजला डोक्यावर घेतले. नाचत असताना पंकजच्या हातात तळपती तलवार दिली. बड्डेबॉयने तलवार हवेत भिरकावत नाच सुरू ठेवला. नाच सुरू असतानाच दोन मित्रांनी हातात केक घेऊन पंकजपर्यंत पोहोचवला. पंकजने नाचत असतानाच तलवारीने केक कापला. हा सर्व प्रकार वाढदिवसात हजर असलेल्या तरुणांनी मोबाइलच्या कॅमेऱ्यात चित्रित केला होता. ‘भाईचा बड्डे’ मोठ्या थाटात साजरा झाल्याचा हा व्हिडिओ काही सेकंदातच सोशल मीडियातून इतरत्र पोहोचवला गेला. काही शुभचिंतकांनी ताे थेट पोलिसांपर्यंत पोहोचला. पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांनी या प्रकाराची माहिती काढली. व्हिडिओमधील बड्डेबॉय पंकजची ओळख पटवण्यात आली. यानंतर राहुल घेटे, बाविस्कर, कांबळे, मुकुंद गंगावणे, राहुल पाटील यांच्या पथकाने पंकज चौधरी याला अटक केली. त्याच्या ताब्यातून तलवारही हस्तगत केली. राहुल घेटे यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.