मुंबई, वृत्तसंस्था । राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होतांना दिसत आहे. देशमुखांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. डिफॉल्ट जामीनासाठी देशमुखांनी हा अर्ज दाखल केला होता. विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश आर.एन. रोडके यांच्यापुढे आजची सुनावणी पार पडली. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची कोर्टानं वेळेत दखल न घेतल्याचा दावा नाकारण्यात आला आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडीने देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रींगचा गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यात देशमुखांना अटक करण्यात आली. तर राज्य सरकारने परमबीर यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना केली.
दुसरीकडे चांदीवाल आयोगासमोरील चौकशी दरम्यान निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना कोणतीही आर्थिक मागणी केली नव्हती. तसेच त्यांनी कोणत्याही बारमालकांकडून पैसे घेतले नाहीत, असा जबाब दिला होता.