जळगाव – ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो,’ असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवणाळा येथे केले. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. पटोले यांच्या वादग्रस्त विधानानंतर खळबळ उडाली आहे. नाना पटोले यांच्या या विधानानंतर भाजपने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १३, पंचायत समितीच्या २५ आणि नगरपंचायतच्या १६ जागांसाठी निवडणूक होत आहे. दरम्यान, रविवारला निवडणूक प्रचार थांबला. या वेळी लाखनी तालुक्यातील जेवणाळा या गावात नाना पटोले यांची प्रचार सभा झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्ता आणि नागरिकांशी संवाद साधला. त्यात त्यांनी, ‘मी भांडतो, मी मागील ३० वर्षांपासून राजकारणात आहे. लोक पाच वर्षांत आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा-कॉलेज काढून आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करून टाकतात. मी एवढी वर्षे झाली, राजकारण करतोय, पण एकही शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करतो. म्हणून मी मोदीला मारू शकतो, शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्याविरोधात प्रचारास आले.
एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्यासमोर उभे आहे..’ अशा वक्तव्याचा ३८ सेकंदांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीकेची झोड उठली. राज्यभरातून नाना पटोले यांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात येत आहे. पटोलेंविरुद्ध भाजप मोठा आक्रमक झाला असून राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा इशारा भाजपने दिला आहे.
नाना पटोले यांच्या वादग्रस्त विधानानंतर भंडाऱ्याचे भाजपचे खासदार सुनील मेंढे हे स्वतः भंडारा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाले. तब्बल दोन तास खासदार मेंढे हे भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी बसून होते. या प्रकरणात नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आक्रमक भूमिका खासदार मेंढे यांनी घेतली होती.