मुंबई, प्रतिनिधी । आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्याने ‘सुसाईड नोट’मध्ये नैराश्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत २६ वर्षीय विद्यार्थी हा मास्टरच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्याने कॅम्पस इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. त्यानंतर त्याला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले.
पवई पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, मृत विद्यार्थ्यावर नैराश्यावरील उपचार सुरू होते. “आम्हाला सांगण्यात आले आहे की तो काही काळ नैराश्यात होता आणि उपचार घेत होता. त्याने त्याच्या खोलीत एक संदेश देखील सोडला आहे की त्याच्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही,” असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पवई पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
संसदेच्या अधिवेशनादरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले होते की, IIT, IIM, केंद्रीय विद्यापीठे, IESC आणि इतर उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये २०१४ ते २०२१ या वर्षात १२२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी २४ विद्यार्थी अनुसूचित जातीचे, तीन अनुसूचित जमातीचे, ४१ इतर मागासवर्गीय आणि तीन अल्पसंख्याक आहेत.