मुंबई – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामामागे लागलेली अडथळय़ांची मालिका आता थांबण्याची चिन्हे आहेत. विविध संकटांवर मात केल्यानंतर या कामासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवून तीन कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. त्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्णत्वाकडे येत असल्याने येत्या एक ते दीड महिन्यात नव्याने कामाचा ‘श्रीगणेशा’ होण्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली.
अमरावती ते नवापूपर्यंतचा (गुजरात राज्याची हद्द) ४८०.७९ कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम विविध कारणांमुळे २०१३ पासून सातत्याने रखडले आहे. अमरावती ते चिखली (नांदुरा अगोदरचे गाव) १९४ कि.मी. आणि फागणे ते नवापूर १४०.७९ कि.मी. अशी कामाची विभागणी झाली आहे. अमरावती ते चिखलीपर्यंतचे २२८८.१८ कोटी रुपयांचे कंत्राट ‘आयएल अॅण्ड एफएस’ अंतर्गत असलेल्या ‘आयटीएनएल’ कंपनीकडे होते.
टाळेबंदीमुळे प्रक्रिया ठप्प झाल्याने कामाला दिरंगाईचा सामना करावा लागला. आता मात्र पुन्हा एकदा कामाने गती घेतली. या कामासाठी कंत्राटदारांनी स्वतंत्र कंपनीची स्थापना करून त्या कंपनीच्या नावाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) सोबत करारनामे केले आहेत. ‘फायनान्शियल क्लोज’ होणे अद्याप बाकी आहे. यामध्ये कंत्राटदारांनी बँकांकडून प्रकल्पासाठी कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून घेण्याच्या प्रक्रियेचा समावेश असतो. त्यासाठी करारनाम्यानंतर १५० दिवसांची मुदत असते. राजपथ इन्फ्राची २९ डिसेंबर, ‘मोन्टे कॉर्लो’ची २९ नोव्हेंबर व कल्याण टोल्सची १५ डिसेंबपर्यंत ‘फायनान्शियल क्लोज’ची मुदत आहे.
प्राथमिक तयारीला प्रारंभ
महामार्ग चौपदरीकरणाचे काम नव्याने सुरू करण्यापूर्वी कंत्राट मिळालेल्या कंपन्यांनी प्राथमिक तयारीला प्रारंभ केला आहे. साफसफाई, यंत्रसामुग्री, कच्चा माल तयार करण्यासाठी प्रकल्पाची मंजुरी, प्रकल्पाची उभारणी, कामगारांची उपलब्धता आदी कार्याला सुरुवात झाली आहे.
दोन वर्षांत काम पूर्ण
महामार्गाचे काम करण्यासाठी कंत्राटदार कंपन्यांना ‘अपॉइंटमेंट डेट’पासून दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत चौपदरीकरण पूर्ण होईल. मार्गातील तीन टोल नाक्यांवर वसुलीचे अधिकार ‘एनएचएआय’कडेच राहतील. देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी मात्र कंत्राटदार कंपनीची राहणार आहे.
‘हायब्रीड अॅन्युटी’ तत्त्वावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. तांत्रिक प्रक्रिया सुरू असून लवकरच कामाला प्रारंभ होईल.
– विलास ब्राह्मणकर, प्रकल्प संचालक
तथा महाव्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.