जळगाव – देशभर मकर संक्रांतीचा हा सण उत्साहाने साजरा केला जातो तसेच विविध प्रदेशात वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळगूळ आणि खिचडी खाल्ली जाते. तर बिहारमध्ये दही, चिवडा आणि गूळ एकत्र करून दही चुरा गूळ हा खाद्य पदार्थ तयार केला जातो. या दिवशी या पदार्थाना इतकं महत्त्व का आहे याची तुम्हाला माहिती कदाचित नसणार तर जाणून द्या.
सूर्याचं एका राशीतून दुसर्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते त्याला मकर संक्रांती असं म्हटलं जातं. यावेळी सूर्याचं दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत असतं. यानंतर दिवस हळूहळू मोठा होत जातो. सूर्याचे उत्तरायण झाल्यानं सर्व काळ हा शुभ सुरू होत असल्याची मान्यता आहे. या काळात केलेल्या कामांना यश येत असून याचे फळ तुम्हाला 100 पट मिळते अशी लोकांची धारणा आहे.
या दिवशी तांदूळ आणि उडीद डाळीची खिचडी खाण्याची परंपरा आहे. तांदळाला चंद्राचं रूप देण्यात आलं असून डाळीला शनीचं रूप देण्यात आलं आहे. याचबरोबर हिरव्या भाज्यांना बुद्ध ग्रहाचं रूप देण्यात आलं आहे. या सगळ्यांचा सूर्य आणि मंगळाशी थेट संबंध असल्याने या पदार्थांची खीर करून खाल्ली जाते. या सर्व ग्रहांचा सूर्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याने अनेक ठिकाणी खिचडी पर्वदेखील भरवलं जातं.
या दिवशी खिचडी आणि तीळगूळ खाण्याला वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. या दिवसात हिवाळा ऋतू सुरू असतो. यामुळे थंडी मोठ्या प्रमाणात असल्याने आणि सूर्य दुसऱ्या राशीत प्रवेश करत असल्याने आजार वाढण्याची शक्यता असते. थंडीत शरीराला उष्णता आणि स्निग्धतेची आवश्यकता असते. तिळामध्ये आणि खिचडीमध्ये गरम गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.. तसंच गुळातही उष्णता असल्याने या पदार्थांचे महत्त्व आहे.