जळगाव – जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शिवतीर्थ मैदानावर यापुढे व्यावसायिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात येणार आहे. प्रदर्शने, व्यापारी कार्यक्रमांना यापुढे या मैदानावर कार्यक्रमांची परवानगी देण्यात येणार नाही. यासंदर्भात जिल्हा परिषदेत येत्या ३ जानेवारी राेजी हाेणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठराव करण्यात येणार आहे.
मैदानाचा व्यावसायिक उद्देशाने वापर केला जात असल्याने महसूल विभाग व मनपा जिल्हा परिषदेकडून खुल्या भूखंडांचा व्यापारी दराने कर आकारणी करीत आहे. व्यावसायिक वापर सुरू केल्यापासून जिल्हा परिषदेकडे महसूल विभागाचा २ काेटी १९ लाख ४७ हजार रुपये कर थकला आहे. तर मनपाचा १ काेटी ६९ लाख रुपये कर थकला आहे. जिल्हा परिषदेने मैदानाचा व्यावसायिक वापरासाठी वापर बंद केल्यास महसूल आणि महापालिकेकडून व्यापारी दराने कर आकरला जाणार नाही, असे कळवण्यात आले
शिवतीर्थ मैदान व्यावसायिक प्रदर्शनांसाठी मिळणार नाही आहे. या मैदानाच्या उत्पन्नापेक्षा कराची रक्कम अधिक असल्याने या मैदानाचा व्यावसायिक वापर बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. याबाबतचा ठराव ३ जानेवारी राेजी हाेणाऱ्या सर्वसाधारण सभेत केला जाणार आहे.
केवळ क्रीडा, शैक्षणिक वापर –
शिवतीर्थ मैदानाचा वापर केवळ क्रीडा आणि शैक्षणिक कार्यक्रमासाठीच करता येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद नाममात्र देखभाल, दुरुस्ती शुल्क आकारू शकणार आहे. त्यामुळे या मैदानावर यापुढे केवळ क्रीडा आणि शैक्षणिक कार्यक्रमांनाच परवानगी दिली जाणार आहे.
व्यावसायिक वापर केल्यास कराचा बाेजा वाढणार –
शिवतीर्थ मैदानावरील व्यावसायिक कार्यक्रमांचा शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रमाच्या श्रेणीत समावेश करून वापर करण्याचा प्रयत्न केल्यास महसूल आणि महापालिकेकडून दंडासह कर वसूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे प्रकार हाेऊ नये याची जबाबदारी विद्यानिकेतन शाळेकडे साेपवली जाणार आहे.


