जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा बँकेच्या संचालिका अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यावर सोमवारी रात्री ९ वाजता हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी अॅड.रोहिणी खडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसेनेचे पदाधिकारी छोटू भोई, सुनिल पाटील व पंकज कोळी यांच्यासह अन्य चौघांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा बँकेच्या संचालिका अॅड.रोहिणी खडसे या चांगदेव येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुक्ताईनगरकडे येत असताना सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजता माणेगाव फाट्याजवळ जिनींगजवळ त्यांच्या कार क्रमांक एमएच १९ सीसी-१९१९ समोर चार मोटारसायकलवरुन आलेल्या ७ हल्लेखोरांनी हल्ला चढविला होता. हातात तलावर, पिस्तूल व लोखंडी रॉड असलेल्या सात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात चारचाकीचा काच फुटला होता. यावेळी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होता. या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना सुदैवाने कसलीही दुखापत झालेली नाही. हल्ला केल्यानंतर काही क्षणातच हल्लेखोर पळून गेले होते.
या घटनेमुळे मुक्ताईनगरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात येऊन घटनेचा निषेध केला. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे देखील रात्रीच पोलीस ठाण्यात आले होते. अॅड.रोहिणी खडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसात शिवसेनेचे पदाधिकारी छोटू भोई, सुनिल काशिनाथ पाटील (दोघे रा. मुक्ताईनगर ), पंकज कोळी (रा.चांगदेव) आणि ४ अनोळखी व्यक्तींविरोधात दंगलीचा तसंच हत्यार प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली आहे. याप्रकरणी तपास सुरू असून अद्याप कुणालाही अटक केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.