जळगाव, प्रतिनिधी । ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ या राष्ट्रभक्तीच्या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सादर करण्यात आलेल्या भाषणांनी संपूर्ण सभागृहात राष्ट्रभक्तीने जागृत झाले होते. युवावर्गाला जागृत करण्याचे कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आले. स्पर्धेत पाचोरा येथील हर्षल पाटील याने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली.
जिल्हा प्रशासन आणि भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्र जळगावच्या माध्यमातून तालुकास्तरावर ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत प्रत्येक तालुक्यात गेल्या आठवड्यात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेची जिल्हास्तरीय फेरी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी अल्पबचत भवनात पार पडली. सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे डॉ.उमेश गोगडीया, भुसावळ रेल्वे विद्यालयाचे प्राचार्य एस.व्ही.कुलकर्णी, केसीईचे प्रा.संदीप केदार, जेष्ठ नाट्यकर्मी विनोद ढगे, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी, माजी युवा स्वयंसेवक चेतन वाणी आदी उपस्थित होते.
प्रस्तावना करताना युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी, नेहरू युवा केंद्राने राबविलेल्या मॅरेथॉन स्पर्धा, स्वच्छ भारत अभियानाची माहिती दिली. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असून १८ ते ३५ वयोगटातील युवावर्गाला सहभागी करून घेतले जात आहे. वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम विजयी स्पर्धकाला राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास’ या विषयाच्या माध्यमातून आपण देशनिर्माण करण्याचा प्रयत्न करूया असे आवाहन डागर यांनी केले.
*समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुढे यावे*
देशाच्या लोकसंख्येत युवावर्गाची संख्या सर्वाधिक आहे. देशाच्या जडणघडणीत तरुणांचा मोठा वाटा आहे. युवावर्गाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होत देशासाठी वेळ देणे आवश्यक आहे. देशाच्या आणि समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी युवा जेवढा पुढे येईल, समाजकार्यात सहभागी होईल तेवढ्या लवकर आपल्याला बदल दिसेल. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत उपक्रमात युवांची एकजूट दिसल्याने त्याचे परिणाम देखील चांगले आले, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सांगितले.
*कोरोना काळात तरुणांचे मोठे योगदान*
उपजिल्हाधिकारी प्रसाद मते म्हणाले की, कोरोना आणि लॉकडाऊन काळात अनेक तरुण पुढे आलेत ज्यांना समाजासाठी काही करायचे होते. युवा जेव्हा आपला मौलिक वेळ देशासाठी द्यायला लागतो तेव्हा खऱ्याअर्थाने देशनिर्माणला सुरुवात होते. आपल्या आजूबाजूला असलेली स्पर्धा आपल्याला समाजकार्य करण्यास प्रेरणा देते. आपण समाजाचं देणं लागतो हे समजल्यावर आपसूकच देशहिताच्या गोष्टी घडतात, असे मते यांनी सांगितले.
*अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण*
स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या उपस्थितीत पार पडले. प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, एनएसएसचे संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित, एनएसएसचे जिल्हा समन्वयक डॉ.दिनेश पाटील, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, भूषण लाडवंजारी, दीपक सपकाळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अश्विनी सोमवंशी यांनी केले. आभार नेहरू युवा केंद्राचे लेखापाल अजिंक्य गवळी यांनी मानले.
*प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारणे आवश्यक*
अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी, अनेक अभियान राबवून देखील गल्लोगल्ली अस्वछता दिसते. एकमेकांवर न ढकलता प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे युवावर्गाला आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली जाते. देशाच्या उभारणीत सामाजिक आणि नवनवीन कार्यक्रमांचा मोठा सहभाग आहे, असे त्यांनी सांगितले.
*राष्ट्र उभारणीसाठी लाजू नये*
डॉ.पंकजकुमार नन्नवरे यांनी, नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेत लाजणारा व्यक्ती चालत नाही. धावणारा, पळणारा आणि प्रचंड उत्साह असलेला युवा त्याठिकाणी असायला हवा. सोशल मिडीयाच्या नादी लागून कुटुंबाचे कुटुंब उध्वस्त होत आहेत. थोर पुरुषांनी बलिदान दिले तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यांनी काय योगदान दिले हे माहिती होण्यासाठी ही स्पर्धा आहे. भारताच्या प्रतिज्ञेतील प्रत्येक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लावल्यास आपल्याला लाज वाटल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
*हर्षल पाटील करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व*
जिल्हा प्रशासन आणि नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ३३ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास या विषयावर त्यांनी भाषण केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक हर्षल प्रवीण पाटील, पाचोरा, द्वितीय क्रमांक प्रणिता श्रीकांत काबरा, जामनेर, तृतीय क्रमांक सायली गणेश महाजन, भुसावळ यांनी पटकावला. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देण्यात आले. राज्यस्तरीय स्पर्धेत हर्षल पाटील जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्र राज्यस्तरावर तो विजयी झाल्यास त्याला दि.२६ जानेवारी २०२२ रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
*स्वच्छ भारत अभियानाचे पुरस्कार वितरण*
जिल्हाभरात आझादी का अमृत महोत्सव स्वच्छ भारत कार्यक्रम राबविण्यात आला होता. कार्यक्रमातील प्रथम पुरस्कार तेजस पाटील, द्वितीय पुरस्कार पल्लवी तायडे, तृतीय पुरस्कार मुकेश भालेराव यांना तर उत्कृष्ट गट पुरस्कार बोरसे युवा फाऊंडेशन, मोरार ता.जामनेर यांना जाहीर झाला होता. आजच्या कार्यक्रमात विजेत्यांना मान्यवरांच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच कोविड काळात स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या माजी स्वयंसेवक आकाश वाघ याचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहन अवचारे, तेजस पाटील, दुर्गेश आंबेकर, शंकर पगारे, हेतल पाटील, नेहा पवार, सागर नाजणे, मनोज पाटील, सुश्मिता भालेराव, कल्पना पाटील, पल्लवी तायडे, आनंदा वाघोदे, मुकेश भालेराव, उमेश पाटील, गौरव वैद्य यांच्यासह सर्व युवा स्वयंसेवकांनी आदींनी परिश्रम घेतले.