मुंबई, वृत्तसंस्था । ट्विटर या समाजमाध्यम मंचाचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरून लवकरच पायउतार होणार आहेत. उत्तराधिकारी म्हणून ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे कंपनीने सोमवारी जाहीर केले.
पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. ते २०११ पासून कंपनीच्या सेवेत आहेत. २०१७ मध्ये त्यांची कंपनीचे ‘सीटीओ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जॅक डॉर्सी सीईओपदाचा राजीनामा देणार असले तरी कंपनीच्या संचालक मंडळावर मुदत संपेपर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत राहणार आहेत. अग्रवाल यांनी जॅक आणि संपूर्ण चमूबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे ट्वीट केले. जग आपल्याकडे पूर्वीपेक्षाही अधिक अपेक्षेने पाहत आहे. आपण ती अपेक्षापूर्ती करूया, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे. जागतिक तंत्रज्ञानविषयक कंपन्यांच्या ‘सीईओ’पदी अनेक भारतीय विराजमान आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, ‘आयबीएम’चे अरविंद कृष्ण, ‘अॅडोब’चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.