जळगाव, प्रतिनिधी । आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे मात्र, चांदीच्या भावात मोठी घसरण दिसून आलीय. आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅमचा सोन्याच्या भावात १७० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदी प्रति किलो ११३० रुपयांनी स्वस्त झाली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे जगाची चिंता वाढली आहे. या नव्या व्हेरिएंटचा परिणाम अनेक गोष्टींवर झाला असून काहिसा सोन्याच्या किमतीतही झाल्याचे दिसत आहे.
यामुळे येत्या काळात सराफ बाजारात सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आज सोमवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव १७० रुपयांनी वाढून तो ४८,७०० रुपयांवर गेला आहे. तर चांदी भाव ११३० रुपयांनी स्वस्त होऊन ६३,५०० प्रति किलो इतक्यावर आला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते. काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात चढ-उतार दिसून आले आहे. गेल्या आठवड्यात जळगावात सराफ बाजारात सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आली. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील घसरण दिसून आली. गेल्या आठवड्यात सोन्याचा भावात १६८० रुपयांची घसरण झाली होती. तर दुसरीकडे या आठवड्यात चांदी ३ वेळा स्वस्त झाली आहे तर दोन वेळा महागली आहे. त्यात ३५५० रुपयांची घसरण दिसून आली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे जगाची चिंता वाढली आहे. याचाच परिणाम म्हणून पुढील काही दिवस सोन्याच्या दरामध्ये तेजी राहु शकते, दुसरीकडे वाढती महागाई, डॉलरच्या तुलनेमध्ये घसरलेला रुपया अशा कारणांमुळे देखील सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान येणाऱ्या काळात सोन्याच्या दरामध्ये आणखी तेजी येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अल्पकालावधीसाठी सोन्यामध्ये केलेली गुंतवणुक अधिक नफा मिळून देऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
सध्या सराई सुरु असल्यामुळे सोने चांदीच्या भावात मागणी वाढू लागली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोने प्रति तोळा 56 हजारांवर पोहोचले होते. मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घट झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या सोन्याच्या भावात ७५०० रुपयाची घसरण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, कोरानाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्याने सोन्याचे भाव पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे आताच स्वस्तात सोने खरेदी संधी आहे.
२२ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,९७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६७,०९० रुपये असा होता. २३ नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६६,०८० रुपये असा होता. २४ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,९७० रुपये इतका आहे. २५ नोव्हेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६४,१०० रुपये इतका आहे. २६ नोव्हेंबर (शुक्रवारी) सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४८,५३० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,६३० रुपये इतका आहे. २७ नोव्हेंबर शनिवार सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४८,५३० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,६३० रुपये इतका आहे.
अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.