उत्तर प्रदेश, वृत्तसंस्था । उत्तर केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांची कपात केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमधून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर देशातील भाजपाशासित अनेक राज्यांनी इंधन दरात कपात केली आहे.
उत्तर प्रदेशसह अनेक राज्य सरकारांनी इंधनाचे दर कमी केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना अधिक दिलासा मिळणार आहे. याआधी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे धर्मेंद्र प्रधान यांनी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा मोदी सरकारचा हा निर्णय आहे असे म्हटले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या व्हॅटमध्ये कपात करण्याच्या निर्णयानंतर उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये १२ रुपयांनी घट झाली आहे.
केंद्राने बुधवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर पाच रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी केले. काही तासांनंतर, उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलवरील व्हॅट सात रुपये आणि डिझेलवर दोन रुपयांनी कमी करण्यात आला. अशा प्रकारे दोन्ही इंधनांच्या किमती येथे प्रतिलिटर १२-१२ रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यानंतर, कर्नाटक, गोवा, त्रिपुरा आणि आसामच्या सरकारांनी दोन्ही इंधनांनच्या करात आणखी कपात केली. या राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करात प्रत्येकी सात रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे डिझेलच्या दरात प्रति लिटर १७ रुपये आणि पेट्रोलच्या दरात १२ रुपयांनी कपात होणार आहे.
बिहारमध्ये नितीश कुमार यांनीही सर्वसामान्यांना दिवाळीची भेट दिली आहे. नितीश कुमार यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पेट्रोलवर एक रुपया ३० पैसे तर डिझेलवर एक रुपया ९० पैसे सवलत देण्याची तयारी सुरू आहे. केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल १० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. या दोन्ही सवलतींनंतर बिहारमधील जनतेसाठी पेट्रोल ६.३० रुपये आणि डिझेल ११.९० रुपये स्वस्त होणार आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनीही घोषणा केली की राज्य सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यासाठी अधिसूचना जारी करेल. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “हिमाचलच्या डोंगराळ राज्यातील वाहतुकीची साधने पेट्रोल आणि डिझेलवर अवलंबून आहेत, त्यामुळे या सवलतीचा थेट लाभ जनतेला मिळेल. पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्यासाठी राज्य सरकार लवकरच अधिसूचना जारी करणार आहे.
वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आणि सांगितले की या पाऊलामुळे सामान्य लोकांना फायदा होईल, वापर वाढेल आणि आपल्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. मात्र, काँग्रेसने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत तर केले, पण ताशेरेही ओढले आहेत.