नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (( UPSC ) 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
विद्यार्थ्यांना हा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर upsc.gov.in पाहता येणार आहे. यूपीएससीच्या वेबसाईटवर हा निकाल पीडीएफ स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये यशस्वी उमेदवाराचे नाव, रोल नंबर प्रकाशित करण्यात आला आहे. त्यासाठी आयोगाच्या वेबसाईटवर ‘What’s New’ या सेक्शनवर क्लिक करावं लागेल. या यादीत केवळ यशस्वी विद्यार्थ्यांची नावंच प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे या यादीत जर नाव नसेल तर तो विद्यार्थी यूपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार नाही.
या पूर्व परीक्षेसाठी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा ही 7 जानेवारी ते 16 जानेवारी 2022 या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठीचे हॉल तिकीट हे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आयोगाच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करण्यात येऊ शकतील. या वर्षी 712 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण जागांच्या तुलनेत बारा ते तेरा पटीने विद्यार्थी हे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आले आहेत.
यंदाच्या 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. पीएससी 2020 चा अंतिम निकाल काही महिन्यांपूर्वीच लागला आहे. त्यामध्ये एकूण 761 उमेदवार यशस्वी झाले आहेत. पैकी 545 पुरुष आणि 216 महिला यशस्वी झाल्या आहेत. त्यामध्ये शुभम कुमार पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे.