भुसावळ प्रतिनिधी | येथून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या जवळ ट्रॉला, कोंबड्या वाहून नेणारी पीकअप व्हॅन आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाले असून दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी जखमींना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले आहे.
भुसावळजवळील साकेगाव येथील उड्डाणपुलाच्या उतारावर रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास ट्रॉला आणि कोंबड्या वाहून नेणार्या व्हॅनची टक्कर झाली. यात एमएच-१९ पीजी ०२२४ या क्रमांकाच्या दुचाकीलाही या दोन्ही वाहनांनी उडविले. या अपघातात मोटारसायकल चक्काचूर झाली असून ट्रॉला आणि पीक अप व्हॅनचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून व्हॅनमधील एक तर ट्रॉलातील एक असे दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, ट्रॉला आणि पीकअप व्हॅनचे ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
भुसावळ तालुका पोलीस स्थानकाचे निरिक्षक शेंडे, शहर स्थानकाचे निरिक्षक प्रतापराव इंगळे, एएसआय राठोड, हेड कॉन्स्टेबल काझी व हेड कॉन्स्टेबल भोई यांच्यासह बाजारपेठ पोलीस कर्मचारी आणि नशिराबाद टोलनाका कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताचे पार्थिव शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. संबंधीत मृत तरूणाची ओळख पटली असून तो भुसावळातील रहिवासी असून रात्री जळगाव येथून काम करून घरी येत असतांना त्याच्यावर काळाने घाला घातला.