जळगाव प्रतिनिधी | पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना माहिती मिळताच बंदी असलेल्या बायो-डिझेलची साठवणूक करून विक्री करणार्यांवर एलसीबीने मारलेल्या छाप्यात २० लाख ७५ हजार रूपयांचे बायो-डिझेल जप्त करण्यात आले असून तिघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने भुसावळ ते मुक्ताईनगर महामार्गाला लागून असणार्या हॉटेल गरीब नवाज ढाब्याजवळ छापा टाकला. त्यात बायोडिझेलची काळ्या बाजारात चोरटी विक्री करण्यासाठी जमिनीत पुरलेल्या दोन टाक्या भरलेल्या आढळल्या. या कारवाईत २० लाख ७५ हजार रूपयांचे बायो-डिझेल पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी युसूफ खान नूर खान (वय ५४, रा. सिद्धेश्वरनगर, वरणगाव), आफताब अब्दुल कादर राकोटिया (वय २१, रा. हीना पार्क, वरणगाव) व टँकरचालक बेचू मौर्या चंद्रधन मौर्या (वय ४१, रा. खरगपूर, पो. मेहनगर, आजमगड, उत्तर प्रदेश) या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे जालिंदर पळे, युनूस शेख इब्राहिम, सुनील दामोदरे, दीपक पाटील, रणजित जाधव, किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख, दर्शन ढाकणे, भारत पाटील यांनी ही कारवाई केली.