नवी दिली, वृत्तसंस्था । ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु असलेली पेट्रोल-डिझेल दरवाढीनं महिना अखेरला थोडीशी उसंत घेतल्याचं चित्र आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झाला नाही. दोन दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर उतार-चढाव पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली होती. भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 26 ऑक्टोबर रोजीही पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या किंमती स्थिर आहेत. याआधी 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) नं दिलेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 107.59 रुपये आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर आज (25 ऑक्टोबर 2021) 113.46 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर दिल्लीत डिझेल 96.32 रुपये आणि मुंबईमध्ये 104.38 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. देशातील प्रमुख महानगरांबाबत बोलायचं झालं तर, मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. ऑक्टोबरमध्ये तेलाच्या दरांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. एकीकडे कोरोना महामारीच्या संकटामुळे हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल दरवाढीची झळ बसत आहे. ऑक्टोबर महिन्यात पेट्रोलची किंमत प्रति लीटर सहा रुपयांनी वाढली आहे. तर डिझेलची किंमतही सात रुपयांनी वाढली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसला आहे.
प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
शहराचं नाव पेट्रोल रुपये/लीटर डिझेल रुपये/लीटर
दिल्ली 107.59 96.32
मुंबई 113.46 104.38
चेन्नई 104.52 100.59
कोलकाता 108.11 99.43
भोपाळ 116.26 105.64
रांची 101.89 101.63
बेंगळुरु 111.34 102.23
पाटना 111.24 102.93
चंदीगढ़ 103.59 96.03
लखनौ 104.54 96.78
नोएडा 104.76 96.47
(स्रोत- IOC SMS)
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
जगभरात कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, परंतु, उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेल च्या किमतींमध्ये वाढ होणं, सामान्य बाब आहे.