जळगाव, प्रतिनिधी । सोळा वर्षाच्या मुलीवर नराधम पित्याने तीन वर्ष वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिता-पूत्रीच्या पवित्र नात्याला कलंक लागल्याची घटना शहरातील एका भागात घडली. आपल्या सख्या 16 वर्षीय मुलीवरच नराधम पित्याने तीन वर्षांपासून अत्याचार केला मात्र छळ असह्य झाल्याने अत्याचाराला वाचा फुटली व नराधम पित्याविरोधात पीडीतेने भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार नोंदवल्याने पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 41 वर्षीय संशयीत आरोपी पित्याला अटक करण्यात आली.
शहरातील एका भागात पीडीता आपल्या वडिल व आत्या व भावासह राहते. पीडीतेच्या आईचे 13 वर्षांपूर्वीच निधन झाल्याने आत्यानेच पीडीतेचा सांभाळ केला. दरम्यान, संशयीत आरोपी तथा नात्याने पीडीतेच्या 41 वर्षीय पित्याने शनिवार, 23 रोजी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान पीडीतेवर पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने पीडीतेने विरोध करीत बाजारपेठ पोलीस ठाणे गाठले व पोलिसांकडे अत्याचाराची कैफियत मांडली. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी पीडीतेचे म्हणणे ऐकून घेत तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला शनिवारी अटक केली.
पीडीतेच्या तक्रारीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून नराधम पित्याकडून अत्याचाराचा प्रकार सुरू होता शिवाय घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व निरीक्षक भागवत यांनी घटनास्थळी पाहणी केली. आरोपीविरोधात भुसावळ बाजार पेठ पोलिसात भाग 5, गुरनं भादविं कलम 376 (3), 506 व बालकांचे लैंगिक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम-6 प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत आरोपी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे नाईक विकास सातदिवे, निलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, योगेश माळी, जावेद शहा, जाफर शेख आदींच्या पथकाने एका भागातून अटक केली.
तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, गजानन वाघ करीत आहेत.