मुंबई, वृत्तसंस्था । गेले दीड वर्ष बंद असलेली राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू होणार आहेत. मर्यादित उपस्थिती, लसवंतांनाच प्रवेश हे नियम लागू राहतील. मात्र, सध्या ऑनलाइन सत्र परीक्षा सुरू असल्याने अनेक महाविद्यालयांनी दिवाळीनंतरच प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या संकुलातील गजबज दिवाळीनंतरच वाढण्याची शक्यता आहे.
करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर ग्रामीण भागांतील काही महाविद्यालये अल्प कालावधीसाठी सुरू झाली होती. परंतु, दुसऱ्या लाटेनंतर सर्वच महाविद्यालये पुन्हा बंद झाली होती. सध्या अनेक महाविद्यालयांमध्ये पहिल्या सत्राच्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे बऱ्याच महाविद्यालयांनी बुधवारपासून वर्ग सुरू करण्यास असमर्थता दर्शवली आहे. के वळ विज्ञान, अभियांत्रिकी आदी शाखांच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बोलावले जाणार आहे.
करोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षक-शिक्षके तर कर्मचाऱ्यांची माहिती महाविद्यालयांनी जमा केली आहे. मात्र, ५० टक्के उपस्थितीत वर्ग सुरू करायचे असल्याने त्याच्या तयारीसाठी महाविद्यालयांना वेळ हवा आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच महाविद्यालये विद्यार्थ्यांनी गजबजण्याची शक्यता आहे. काही महाविद्यालयांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने संकु लात विद्यार्थी-शिक्षकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. मुंबई, ठाणे महापालिकेने महाविद्यालयांना ही व्यवस्था पुरविण्याचे मान्य के ले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, कर्मचाऱ्यांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत अनेक महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू राहणार आहेत.
राज्यातील करोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांमधील नियमित वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली. त्यास अनुसरून राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित शासकीय व खासगी विनाअनुदानीत विद्यालये व महाविद्यालयातील नियमित वर्गही बुधवारपासून सुरू होत असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
खबरदारी…
’ महाविद्यालयात- विद्यापीठात येणाऱ्या १८ वर्षांवरील सर्व विद्यार्थ्यांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असणे आवश्यक.
’ महाविद्यालयांत प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध.
’ वर्गात ५० टक्के उपस्थितीची मर्यादा. वसतिगृहे टप्प्याटप्प्याने सुरू.
’ लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम.
प्राथमिकच्या शाळा नोव्हेंबरमध्ये? राज्यातील ग्रामीण व शहरी भागांतील बारावीपर्यंतचे वर्ग ४ ऑक्टोबरपासूनच सुरू झाले. त्यापाठोपाठ महाविद्यालयेही सुरू होत असल्याने
के वळ शहरी भागातील सातवीपर्यंतच्या आणि ग्रामीण भागातील चौथीपर्यंतच्या शाळाच बंद आहेत. या शाळाही लवकरात लवकर सुरू कराव्या, यासाठी काही शिक्षक-पालक संघटना, शिक्षणतज्ज्ञ प्रयत्न करत आहेत. मात्र, काही शाळांमध्ये सुरू झालेल्या पहिल्या सत्राच्या ऑनलाइन परीक्षा आणि त्यापाठोपाठ येणारी दिवाळीची सुट्टी यामुळे हे वर्ग सुट्टीनंतर नोव्हेंबरमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे.