पाचोरा, प्रतिनिधी । नेरी येथील ५० वर्षीय इसमाचा तोल गेल्यानंतर ट्रॅक्टरच्या चाकाखाली येवून डोक्याला गंभीर मार लागल्याने जागेवरच ठार झाल्याची घटना घडली.
मयत इसम आपल्या कुटुंबासोबत मध्यप्रदेशात ऊस तोडणीसाठी जात असतांना लोहारी बु” गावाजवळ दि. १७ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे मयताचा मोठा मुलगाच ट्रॅक्टर चालवित होता. पहुर येथुन त्या़ंना अजुन काही मजुर सोबत घेऊन जायचे होते. नेरी ता. पाचोरा येथील लुकमान उस्मान पठाण (वय ५०) हे आपल्या कुटुंबासोबत गेल्या ५ वर्षांपासून मध्यप्रदेशात ऊसतोडीसाठी जात असतात. त्यांचेकडे साखर कारखान्याचे दोन ट्रॅक्टर असुन ते रविवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या दरम्यान नेरी येथुन पहुर मार्गे मध्यप्रदेशात जाण्यासाठी निघाले होते.
त्यांचा मोठा मुलगा बबलु लुकमान पठाण हा ट्रॅक्टर चालवित असतांना लोहारी गावाजवळ ट्रॅक्टरमधील साहित्यावर बसलेले असतांना लुकमान पठाण याचा तोल जावुन ट्रॅक्टरचे मोठे टायर त्यांचे डोक्यावरुन गेल्याने ते जागेवरच ठार झाले.मयताचे शवविच्छेदन डॉ. अमित साळुंखे यांनी केल्यानंतर सदरच्या गुन्ह्याची नोंद पाचोरा पोलिसात होवुन शुन्य क्रमांकाने पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे. मयत इसमास वृद्ध आई, पत्नी, तीन मुले व दोन मुली असा परिवार असून त्यांचेवर नेरी येथे आज दि. १८ रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार विजय माळी हे करत आहेत.