मुंबई, वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या बंद संदर्भात व्यापाऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
काय म्हणाले महाविकास आघाडीचे नेते
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लखीमपूर हिंसाचारावर चर्चा करण्यात आली. त्या घटनेत निधन झालेल्या व्यक्तींना मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यादिवशी अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व दिवसभर बंद राहिल अशी माहिती मंत्री जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर यांनी दिली होती. हा बंद पक्षाच्या वतीने आहे सरकारच्या वतीने नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं होतं. तर शेतकऱ्यांचा पाठीशी शिवसेना नेहमी राहिली आहे, त्यामुळे बंदमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. शेतकरी आंदोलन चिरडताना भाजपची मानसिकता दिसून आली, जनरल डायरच्या भूमिकेत भाजप दिसून आली, असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते.
शरद पवार म्हणाले…
शरद पवार यांनी काल बोलताना म्हटलं होतं की, उत्तरप्रदेशाबाबत माझ्यासह सर्वच विरोधकांनी खंबीर भूमिका घेतली, महाराष्ट्र सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत लखीमपूर घटनेचा निषेध केला. मी स्वत: शेतकऱ्यांवरील या हल्ल्याची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडासोबत केली, त्याचा संताप व राग सत्ताधारी पक्षातील लोकांना आला आहे, त्याची प्रतिक्रीया म्हणूनच महाराष्ट्रात प्राप्तिकर विभागाचे छापासत्र आहे अशी शक्यता नाकारता येत नाही, असं पवार म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले
दरम्यान अजित पवारांनी म्हटलं आहे की, आयटीनं कुठे छापे टाकावेत हा त्यांचा अधिकार आहे. काही शंका असल्यास ते छापे टाकू शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी नियमित टॅक्स भरतो. अर्थमंत्री असल्यानं आर्थिक शिस्त कशी राखायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा असतो हे आपल्याला चांगलं माहिती आहे. पण अजित पवारांचे नातेवाईक म्हणून हे छापे टाकले गेले असतील तर राज्यातील जनतेनं याचा जरूर विचार करावा, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.