जळगाव, प्रतिनिधी । दरवर्षीप्रमाणे पितृ पंधरवडा यंदा नुकताच संपन्न झाला. या काळात पूर्वजांसह आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे शुभाशीर्वाद अर्थात कृपादृष्टी परिवारावर कायम राहावी, या उद्देशातून प्रत्येकजण आपापल्या घरी पूजा-विधी करून त्यांच्याप्रती अर्पित करण्यात येणारा नैवेद्य स्मशानभूमीतील चौथर्यावर काकस्पर्शासाठी ठेवतो. यामुळे या काळात चौथरा परिसरात काहीशी अस्वच्छता निर्माण होते. तसाच काहीसा प्रकार मेहरुण स्मशानभूमीतील चौथरा परिसरात झाला होता.
यासंदर्भात 7 ऑक्टोबर 2021 रोजी ‘महापौर मित्र’कडून व्हॉटस्अॅपद्वारे ‘महापौर सेवा कक्ष’कडे तक्रार (क्र. 2423) नोंदविण्यात आली होती. संबंधित तक्रार निवारणासाठी या कक्षातील प्रतिनिधीने तत्काळ महापालिका अधिकार्यांशी संपर्क साधला. त्यावर महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी श्री.सतीश करोसिया यांनीही तत्परतेने संबंधित स्थळाची पाहणी करून सफाई कर्मचार्यांच्या माध्यमातून चौथर्याची स्वच्छता, तसेच पडलेल्या कचर्याची त्वरेने विल्हेवाट लावत चौथरा परिसर संपूर्णपणे चकाचक केला. तसेच मेहरुण तलावाकाठच्या गणेश घाटावरही सर्वपित्री अमावास्येनिमित्ताने पूजा-विधीसह तर्पण अर्पण करून दीपप्रज्वलित केले जातात. त्यामुळे निर्माण झालेली घाणही महापालिका आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचार्यांनी स्वच्छ केली.
या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिकसह गल्लीबोळांतील मंदिरे, धार्मिक स्थळे प्रशासन तसेच परिसरातील रहिवाशांना आवाहन, की आपण दर्शनासाठी मंदिरे, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाताना परिसरात अस्वच्छता असल्यास थेट ‘महापौर सेवा कक्षा’शी संपर्क साधा. या कक्षाद्वारे जळगाव शहर महानगरपालिकेतील स्वच्छता व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांमार्फत सफाई कर्मचार्यांकडून संबंधित परिसर तत्परतेने स्वच्छ केला जाऊन मंदिरे, धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखले जाण्यास मदत होईल.
आपण सविस्तर संवाद करण्याकरिता/माहिती देण्यासाठी ‘महापौर सेवा कक्ष’ हेल्पलाईन क्र. 95 90 269 269 यावर सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 2:30 ते सायं. 5 या वेळेत (शासकीय सुटी वगळता) कॉल करून आपली समस्या/तक्रार नोंदवावी.