नाशिक, वृत्तसंस्था । 15 वर्षीय मुलीला ओलीस ठेवून पुण्यातील बडतर्फ सहायक पोलीस उपनिरीक्षकाने गावठी कट्टय़ातून गोळीबार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे घडली आहे. दरम्यान, गोळीची दिशा बदलल्याने श्रीरामपूरचे विभागीय पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके बालंबाल बचावले आहेत. गोळीबार करणाऱया बडतर्फ सहायक पोलीस उपनिरीक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून एका कारसह दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत.
सुनील लक्ष्मण लोखंडे (रा. शिवानंद सोसायटी, वानवडी, जि. पुणे) अशी अटक केलेल्याचे नाव आहे. संबंधित मुलीच्या आईने आरोपीविरोधात आर्म ऍक्ट, अपहरण तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा श्रीरामपूर पोलिसांत दाखल केला होता. हा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठीच लोखंडे याने हा प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपी सुनील लोखंडे याने गुरुवारी (दि. 7) सकाळी डिग्रस येथील संबंधित महिलेच्या बंगल्याच्या मागील बाजूस आपली व्हॅगनर पार्क करून भिंतीवरून बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. लोखंडे दिसताच जीवाच्या भीतीने या महिलेने घराचा दरवाजा बंद केला. यावेळी लोखंडे याने बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या संबंधित महिलेच्या 15 वर्षीय मुलीला ओलीस ठेवून गावठी कट्टय़ातून हवेत गोळीबार करत संबंधित महिलेला धमकावले.
गोळीबाराचा आवाज झाल्याने डिग्रस परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. हातात गावठी कट्टा असलेल्या लोखंडे याने संबंधित महिलेच्या मुलीचे बंगल्याच्या आवारात अपहरण करण्याचा प्रकार नजरेस पडल्याने गावकऱयांच्या काळजाचा थरकाप उडाला. या घटनेची खबर मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी फौजफाटय़ासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लोखंडेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. पोलीस अधिकाऱयाच्या झटापटीत लोखंडे याच्याकडून गावठी कट्टय़ाचे ट्रिगर दाबले गेले. कट्टय़ातून बाहेर पडलेल्या गोळीची दिशा बदलल्याने पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके बालंबाल बचावले. पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, गुन्हा अन्वेषण विभागाचे अनिल कटके, कॉन्स्टेबल राठोड, पारधी व इतर पोलीस पथकाने सुनील लोखंडेवर झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या. घटनास्थळी जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, सौरभ अग्रवाल यांनी भेट दिली.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील यांनी गुरुवारी दुपारी महात्मा फुले कृषी विद्यापीठात पत्रकार परिषद घेऊन घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, आरोपी लोखंडे हा बडतर्फ सहायक पोलीस उपनिरीक्षक असून, त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. तिसरा गुन्हा डिग्रस येथे घडला आहे.
या घटनेत लोखंडेकडून गावठी कट्टय़ातून दोन फायर झाले आहेत. पहिला फायर महिलेला धमकाविण्यासाठी व दुसरा पोलिसांच्या झटापटीत झाला आहे. झडतीमध्ये आरोपीकडे एक वॅगनर कार, दोन गावठी कट्टे आढळून आले आहेत. हे कट्टे मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश भागातील असल्याचा संशय आहे. मुलीच्या गळ्यावर कट्टा लावून आरोपी लोखंडे महिलेस धमकावत असल्याने घटनास्थळावरील परिस्थिती गंभीर होती. मात्र, पोलिसांनी आरोपी लोखंडे याला ताब्यात घेतले. लोखंडेवर खुनाचा प्रयत्न, ओलीस ठेवणे, आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.