नवी मुंबई, वृत्तसंस्था । उन्हाळी कांद्याचा साठा संपत आल्यामुळे राज्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. मागणीपेक्षा आवक कमी होत असल्याने बाजारभाव वाढत आहे. मुुंबई बाजार समितीमध्ये कांदा २५ ते ३५ रुपये किलो दराने विकला जात असून, किरकोळ मार्केटमध्ये कांद्याने चाळिशी ओलांडली आहे.
मुंबई बाजार समितीमध्ये कांदा आवकमध्ये प्रतिदिन मोठ्या प्रमाणात चढउतार होऊ लागले आहेत. सोमवारी ११४३ टन आवक झाल्यामुळे कांद्याला १५ ते २६ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला होता. मंगळवारी आवक घसरली. फक्त ९१७ टन आवक झाली. त्यामुळे बाजारभाव वाढून २५ ते ३५ रुपयांवर पोहोचले. किरकोळ मार्केटमध्येही कांदा ४० रुपये किलो दराने विकला जात आहे. अवकाळी पावसामुळे नवीन कांदा मार्केटमध्ये येण्यास थोडासा वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात व देशात पुढील एक महिना कांदा दरामध्ये तेजी राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बाजारभाव वाढणार
मुंबईमध्ये कांद्याची आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढले आहेत. नवीन पीक बाजारात येईपर्यंत दरामध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे. – अशोक वाळुंज, संचालक, मुंबई बाजार समिती