जळगाव, प्रतिनिधी । येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे 7 ऑक्टोबर, 2021 रोजी होणारी राज्यस्तरीय कापूस परिषद काही तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
मागील काही दिवसात जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे यांचेशी संपर्क करुन जिल्ह्यातील आपत्ती व नुकसानीबाबत सविस्तर चर्चा केली तसेच कृषि विभाग, महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे व प्राथमिक अहवाल करण्यात व्यस्त असल्याचे कृषि मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार पालकमंत्री यांचेशी झालेल्या चर्चेअंती व परिस्थितीचे गांर्भीर्य लक्षात घेवून जळगाव येथे 7 ऑक्टोबर, 2021 रोजी आयोजित राज्यस्तरीय कापूस परिषद-2021 ही काही कालावधीसाठी तुर्तास पुढे ढकलणेबाबत कृषिमंत्री यांनी सुचना दिल्याने ही राज्यस्तरीय कापूस परिषद पुढे ढकलण्यात आल्याचे श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.