जळगाव, प्रतिनिधी । जनावरांमध्ये अचानक ताप व त्वचेवर गाठी येत असल्याने पशुपालन शेतकरी बांधव चितांग्रस्त झाले आहेत. लम्पी आजाराने ग्रस्त असलेल्या पशुधनापासून इतर जनावरांना संसर्ग होऊ नये. यासाठी तातडीने गावपातळीवर लसीकरण मोहीम राबवावी धास्तावलेले पशुपालकांना दिलासा द्यावा. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
आपल्या पत्रात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नमूद केले आहे की सद्यस्थितीत जनावरांमध्ये लम्पी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य चर्मरोग असून हा साथीचा आजार आहे. यात संकरीत जनावरांना संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येणे, लसिका ग्रंथीना सूज येणे, साधारणतः एक आठवडाभर भरपूर ताप येणे, व त्यानंतर त्वचेवर हळूहळू १०-५० मि.मी. व्यासाच्या गाठी किंवा पुरळ येणे अशी लक्षणे आहेत. अशा तक्रारी शेतकऱ्यांनी माझेकडे केल्या आहेत. अनेक जनावरांच्या डोके, मान, पाय, मायांग, कास भागात याची लक्षणे दिसून येतात. दुधाळ जनावरांना संसर्ग झाल्यास दुग्धउत्पादन घटते तसेच काही वेळा गायी वा म्हशीचा गर्भपात होवून प्रजनन क्षमता घटते. लंपी स्किन आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी लक्षणे असलेल्या जनावरांना वेगळे करावे. यासाठी जनजागृती करण्यात यावी. तसेच बाधित व निरोगी जनावरे एकत्रित चारावयास सोडू नयेत. जनावरांची बाधित भागातून ने-आण बंद करावी, रोग नियंत्रणासाठी माशा, डास व गोचीड इत्यादींचे निर्मुलन करण्यात यावे. कीटकनाशक औषधीचा जनावराच्या अंगावर व गोठयात फवारणी आदी उपाययोजना कराव्यात यासाठी पशुसंवर्धन विभागाने गावोगावी आवाहन करण्यात यावे. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली आहे.
चाळीसगांव, पाचोरा, भडगाव येथे अधीक संक्रमण
जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी स्किन आजार संक्रमण वाढत असून यात चाळीसगांव , भडगाव व पाचोरा तालुक्यात जनावरांचा नमुना तपासणी अहवाल पॉझीटिव्ह आल्याने . ऍक्शन प्लॅननुसार , त्या गावापासून 5 कि. मी. क्षेत्रातील सर्व जनावरांमध्ये अधिकाधीक प्रमाणात लसीकरण करण्यात यावे. चाळीसगांव,भडगांव व पाचोरा तालुक्यात पशुधन लसीकरण मोहिमेसाठी पथके तैनात करावीत. जास्तीत जास्त लसीचे डोस उपलब्ध करण्यात येऊन गाव पातळीवर आवश्यकतेनुसार लस उपलब्ध करून देण्यात याव्यात. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली आहे.