मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात सक्रिय असलेल्या परतीच्या पावसाचा जोर पुढच्या चार दिवसांत अधिकच वाढणार आहे. भारतीय हवामान विभाग, मुंबई आणि मंत्रालय नियंत्रण कक्ष यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
बंगालच्या उपसागरात अति कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्यामुळे बहुतांश ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी (दररोज 20 सेमी पेक्षा अधिक); तसेच कोकण आणि गोवा, उत्तर कर्नाटकचा आतील भाग आणि मराठवाडा भागात मुसळधार किंवा अति मुसळधार पाऊस, आणि कर्नाटकचा किनारी प्रदेश तसेच दक्षिण कर्नाटकचा आतील भाग येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व यंत्रणांना सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे.
– विजेच्या कडकडाटासह वादळी वारा वाहणार असल्याने मोकळ्या जागेत उभे राहू नये.
-विजेचे खांब, लोखंडी वस्तू, विद्युत वस्तूंपासून दूर रहावे.
-सुके अन्न पदार्थ, बॅटरी, पुरेशी औषधे, पिण्यासाठी पाणी इ. व्यवस्था करण्यात यावी.
जोरदार मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसह यंत्रणांना सावधानतेचा इशारा
मंगळवारी संध्याकाळी अचानक ढग दाटून आल्याने काळोख पसरला आणि ढगांच्या गडगडाटात व विजेच्या कडकडाटात काही वेळ जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला. या दरम्यान विद्यूत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडीत झाला. यामुळे अभियांत्रिकीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना विजे अभावी समस्येला तोंड द्यावे लागले. सध्या अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या दरम्यान विजेच्या कडकडाटासह वादळी वारा वाहणार असल्याने मोकळ्या जागेत उभे राहू नये. तर विजेचे खांब, लोखंडी वस्तू, विद्युत वस्तूंपासून दूर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी ०२२-२५३०१७४० या दूरध्वनीवरून संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाने केले आहे.