जामनेर – रूग्णालयात जाण्यासाठी मध्यरात्री नगरपालिका चौकात थांबलेल्या गर्भवती महिलेस गस्तीवर असलेल्या पोलीसांनी तात्काळ रूग्णालयात पोहचविल्याने पोलीसांच्या खाकी वर्दीतून माणूसकीचे दर्शन घडले आहे. या महिलेस पोलीसांनी सहकार्य केल्याने रूग्णालयात महिलेने गोंडस मुलाला जन्म दिलाय.
जामनेर तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथील महिलेला रात्री अचानक त्रास होत असल्याने प्रसुतीसाठी जामनेरला खाजगी वाहनाने आली. त्या वाहनचालकाने महिलेसह सोबत आलेल्या सासू सासऱ्यांना रुग्णालयात न पोहचवीता मध्यरात्री पावणेतीन वाजता जामनेर नगरपालिकेसमोर उतरवून दिले. मध्यरात्री कुठलेही वाहन मिळत नसताना याचवेळी पोलीसांचे गस्तीवरील वाहनाने त्यांचेकडे विचारपुस केली व हवालदार रमेश कुमावत यांनी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांचेशी चर्चा करुन महिला, नातेवाईकांना तातडीने डॉ.प्रशांत भोंडे यांच्या हॉस्पीटलमध्ये दाखल केले.
याप्रसंगी हवालदार शाम काळे, प्रदीप पोळ यांनी गोपाल बुळे , ईश्वर चौधरी व भैया महाजन यांनी सहकार्य केले. या महिलेने सकाळी गोंडस मुलाला जन्म दिला. इंगळे यांनी रुग्णालयात जाऊन तीची विचारपुस केली. नातेवाईकांनी पोलीसांच्या माणुसकीमुळेच वेळेवर रुग्णालयात पोहचू शकलो अशी भावना नातेवाईकांनी व्यक्त केली .