नाशिक, वृत्तसंस्था । जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकास शिक्षकाने लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. जखमी मुख्याध्यापकावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भास्कर जाधव असे जखमी मुख्याध्यापकाचे नाव असून, कारभारी महाले, हे मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भास्कर जाधव हे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहतात. ते नेहमीप्रमाणे काम करत होते. या कामातच त्यांनी सहकारी शिक्षक कारभारी महाले यांना शाळेचे काम सांगितले. तुम्ही मला काम कसे सांगितले, याचा राग मनात ठेवून या शिक्षकाने लाकडी दांडक्याने मुख्याध्यापकास अमानुष मारहाण केली. यामुळे मुख्याध्यापक जाधव यांच्या पाठीवर, हातावर जखमा झाल्या आहेत. ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या दिंडोरी शाखेने या मारहाणीचा निषेध केला असून, मारहाण करणारे शिक्षक महाले यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
मारहाणीचे फोटो व्हायरल
दरम्यान शिक्षकाने मुख्याध्यापकाला केलेल्या मारहाणीचे फोटो नाशिक जिल्ह्यातल्या अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर शुक्रवारी व्हायरल झाले होते. अनेक व्हॉट्सअॅप वापर कर्ते मारहाणीची ही पोस्ट शेअर करत होते. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये शुक्रवारी या मारहाणीच्या घटनेची चर्चा होती.
शिक्षकाचा संपर्क नाही
मारहाणीचा आरोप असणारे शिक्षक कारभारी महाले यांची बाजू ऐकुण घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही. त्यांची मोबाइलवर प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाइलही कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होता. त्यामुळे त्यांचे फोनवरही बोलणे झाले नाही.
शिक्षकांवर मानसिक ताण
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांवरील मानसिक ताण वाढला आहे. अनेक ठिकाणी अंतर्गत राजकारण असते. यातून शिक्षक आक्रमक होण्याच्या घटना घडत आहेत. जनगणनेपासून ते विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यापर्यंतची सारी कामे शिक्षकांना करावी लागतात. कोरोना काळात अनेक प्राध्यापक व शिक्षकांना सरकारने विविध कामांमध्ये गुंतवले होते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. त्यामुळे अशी अतिरिक्त कामे शिक्षकांवर सोपवू नका, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.