चाळीसगाव – देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता चाळीसगाव तालुक्याच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली व शिरसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दिनांक 1 व 2 सप्टेंबर रोजी शेवरी येथील अंगणवाडी केंद्रात कोरोना प्रतिबंधक Covishield लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात शेवरी व माळशेवगे येथील 268 नागरिकांना लसीचा प्रथम मात्रा देण्यात आली. गावातील नागरिक अनेक दिवसांपासून लसीच्या प्रतीक्षेत होते. सुमारे 4 ते 5 महिन्यानंतर गावात प्रथमच लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आल्याने नागरिकांनी मोठ्या उत्साहाने शिबिरात सहभाग घेत लसीचा प्रथम मात्रा घेतली.
गेल्या दोन दिवसांपासून शेवरी येथील अंगणवाडी केंद्रात शिरसगाव येथील प्रा.आ.केंद्रामार्फत लसीकरण मोहीम राबवली जात होती. या शिबिरासाठी शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉ.सांगळे, आरोग्य सेवक डॉ.हेमंत शिरसाळ, डॉ.संदीप चौधरी, आरोग्य सेविका सौ.ठाकूर सिस्टर, आशा सेविका निशा चौधरी व मदतनीस पुंजाबाई कोळी, शेवरी अंगणवाडी सेविका छाया पवार व मदतनीस पुनम चौधरी यांनी मेहनत घेतली.