जळगाव, प्रतिनिधी । संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो पशुधन मृत्युमुखी पडले तर हजारो एकर शेती,शेतशिवाराचे अतोनात नुकसान झाले असून, शहरातील नदी किनाऱ्यावरील जनजीवन विस्कळीत झाले आहेत.व्यापाऱ्यांचे दुकानात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बामोशी बाबा दर्गा परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने शहरातील पुराची भीषणता अधोरेखित होत आहे. ग्रामीण भागाचा शहराशी संपर्क तुटला आहे, तर अनेक गावांमधून येण्याजाण्यास मार्ग नाही. पुलांवरून पाणी वाहत आहे. अशा परिस्थितीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कोकणच्या धर्तीवर जिल्ह्यातील अतीवृष्टीबाधितांच्या मदतीसाठी अध्यादेश काढावा. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
अनेक गावे बाधित
आज चाळीसगाव तालुक्यातील वाकडी, वाघडू, जामडी, जावळे, लोंजे, बाणगाव, सर्वाधिक बाधित रोकडे या डोंगर पट्ट्यातील गावात पाण्याने हाहाकार झाला आहे. शेकडो पशूधन शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत वाहून गेले तर अनेक जनावरे खुटयावर मृत्युमुखी पडली आहे. शेतांमध्ये पाणी घुसल्याने हजारो एकर शेती जमिनीला नुकसान झाले आहे. शेतांचे बांध वाहून गेले तसेच ग्रामीण भागातील घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बामोशी बाबा दर्गा परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स, तसेच दयानंद जवळील मेजरनाना कॉम्पलेक्स मध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर शिवाजीघाट ते शनिमंदिर या परिसरातील दुकानदारांना या पर्जन्यवृष्टीने लाखो रुपयांचा फटका बसला आहे.*आज या परिसराची पाहणी रात्री उशिरापर्यंत खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केली.
कोकणच्या धर्तीवर जिल्ह्यातील अतीवृष्टीबाधितांच्या
मदतीसाठी अध्यादेश काढा अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ,राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.
कन्नड घाटात इतिहासात पहिल्यांदाच ठिकठिकाणी कोसळल्या दरडी
कन्नड घाटात ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेक वाहनधारक अडकल्याने आज सकाळपासूनच तेथे मदतकार्य सुरू झाले होते. *खासदार उन्मेश दादा पाटील यांचेशी संपर्क करीत अनेक वाहनचालक,मालक तसेच घाटातील प्रवाश्यांनी व घाटाखालील हॉटेल व्यावसायिकांनी घाटात जागोजागी दरडी कोसळल्याची माहिती दिली होती*. या अनुषंगाने खासदार उन्मेश दादा पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचे अधिकाऱ्यांना तातडीने येथे मदतकार्य सुरू करावे असे आदेश दिले तर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी संपर्क करून तातडीने कन्नड घाटातील दरडी मोकळ्या करण्यासंदर्भात दूरध्वनीवर चर्चा केली त्या अनुषंगाने आज सकाळीच अकरा वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी घटनास्थळावर राज्य आपत्ती निवारण पथकाला पाचारण केले.यावेळी पूर्ण घाटाचे पाहणी करीत खासदार उन्मेशदादा पाटील यांनी मदत कार्यात सहभाग घेतला.
राज्य सरकारने घटनेचे गांभीर्य लक्षात घ्यावे
चाळीसगाव ,पाचोरा, भडगाव यांचेसह जिल्हातील अनेक गावांना या पर्जन्यवृष्टीचा फटका बसला आहे. रोकडे गावात पाण्याचा प्रवाह गावात शिरल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे. वाकडी, वाघडू, जामडी, जावळे, बाणगाव लोंजे या परिसराचे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे.नुकसानीमुळे येथील शेतकरी व ग्रामस्थ हवालदिल झाला आहे. कोकणच्या पूरग्रस्तांना ज्याप्रमाणे राज्याने अध्यादेश काढून भरीव मदत केली त्या कोकणच्या धर्तीवर जिल्ह्यातील अतीवृष्टीबाधितांच्या मदतीचा अध्यादेश काढावा अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केली आहे.