जळगाव – देशातील प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा यांनी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची तुलना तालिबान्यांशी करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जळगावात याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शनीपेठ पोलीस ठाण्यात नगरसेवक कैलास सोनवणे यांनी गुन्हा दाखल केला असून सायंकाळी आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे पुतळा दहन करण्यात आला. तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे.
शायर मूनव्वर राणा यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महर्षी वाल्मिकी यांना दरोडेखोर संबोधत त्यांची तुलना तालिबान्यांशी केली आहे. तसेच ‘आपके लोग किसी को भी भगवान बना देते है’ असे म्हणून त्यांनी समस्त हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे. आजवर ज्या देशवासीयांनी मुनव्वर राणा यांना डोक्यावर घेतले तेच राणा आता हिंदू धर्माविरुद्ध गरळ ओकत सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मुनव्वर राणा यांच्या वक्तव्यामुळे देशातील सामाजिकता आणि एकात्मता भंग होण्याची शक्यता आहे. मुनव्वर राणा यांचा जळगावात निषेध करण्यात आला असून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल
मूनव्वर राणा यांच्या विरुद्ध नगरसेवक कैलास सोनवणे यांनी शनीपेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात दाद मागण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
माजी महापौरांच्या हस्ते पुतळा दहन
जळगाव शहरातील महर्षी वाल्मिक चौकात वाल्मिक लव्य सेना आणि महर्षी वाल्मिक बहुउद्देशीय मंडळातर्फे मूनव्वर राणा यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. माजी महापौर भारती सोनवणे यांनी पुतळा दहन केला. यावेळी राणाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
शायर मूनव्वर राणा यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे. शायर मूनव्वर राणा यांनी ‘आप लोग किसी को भी भगवान बना लेते हैं’ असे वक्तव्य करीत केले आहे. मूनव्वर खान यांनी आजवरच्या हिंदू धर्मियांच्या भावना आणि परंपरागत मान्यतेवर टीका केली आहे. हिंदू धर्मियांचा हा अपमान असून देवी, देवतांच्या अस्तित्वावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मूनव्वर खान यांनी धार्मिक भावना दुखावल्या असून त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, उत्तरप्रदेश मुख्यमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र, पालकमंत्री जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव यांना पाठविण्यात आली आहे.
यांची होती उपस्थिती
मूनव्वर राणा यांच्याविरुद्ध तक्रार देताना आणि इतर प्रसंगी माजी महापौर भारती सोनवणे, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, मुकुंदा सोनवणे, किशोर बाविस्कर, दत्तात्रय कोळी, आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे मोहन शंखपाळ, भरत सपकाळे, निलेश तायडे, रोहिदास ठाकरे, कमलेश सपकाळे, भैय्या पाटील, किशोर सोनवणे, ललित सोनार, युगल सोनार, विष्णू ठाकरे, मनोज रायसिंगे आदींसह इतर संतप्त नागरिक उपस्थित होते.