मुंबई, वृत्तसंस्था । शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. तर प्रताप सरनाईकांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. पण, आता शिवसेनेच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्याविरोधात थेट आयकर विभागानेच तक्रार केली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येण्याची चिन्ह आहे. यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहे. 2019 च्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांचा पराभव केला होता. पण, त्यांनी शपथपत्रात दिलेल्या संपत्तीवरून वाद निर्माण झाला आहे. आयकर विभागाने यामिनी जाधव यांनी एक कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे अशी माहिती मिळाली. पण, आयकर विभागाने जेव्हा तपास केला.
तेव्हा ही एक शेल कंपनी असल्याचे समोर आले. ही कंपनी कोलकात्यातील आहे. या कंपन्याद्वारे काही आर्थिक व्यवहार झाल्याचं उघड झाले आहे. यात यामिनी जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पैसे कमवले.
पण, यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्रात प्रधान डिलर्स नावाच्या एका कंपनीकडून १ कोटी कर्ज घेतले असल्याचे नमूद केले. जेव्हा आयकर विभागाने तपास केला तेव्हा ही प्रधान डिलर्स नावाची शेल कंपनी कोलकात्यामधून उदय महावर नावाचा व्यक्ती चालवत होता. विशेष म्हणजे, उदय महावर या व्यक्तीचं नाव नॅशनल हेराल्ड प्रकरणातही समोर आलं होतं. यामिनी जाधव यांनी एक कोटी कर्ज म्हणून दाखवलं आहे, ती रक्कम त्यांचीच आहे, असा आरोप आयकर विभागाने केला आहे.
यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. यामिनी जाधव यांनी आपल्याकडे जवळपास 7.5 कोटी संपत्ती असल्याचं सांगितलं होतं. तर पती यशवंत जाधव यांच्याकडे 4.59 कोटींची संपत्ती असल्याचं सांगितलं होतं. तर, या कंपनीच्या संचालकपदी चंद्रशेखर राणे, कृष्णा तोडी, धीरज चौधरी अशा चार संचाक म्हणून नावं समोर आली.
उदय महावर यांच्या हाताखाली हे तिघे जण काम करत होते. आयकर विभागाने राणे माजी संचालक प्रियेश जैन यांची चौकशी केली आहे, एक डम्मी संचालक बनवण्यात आला होता. उदय महावर हे कंपनीचे व्यवस्थापन करत होते, असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे त्यामुळे, प्रताप सरनाईक यांच्या पाठोपाठ आमदार यामिनी जाधव यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.