जळगाव : येथील तहसीलदार वैशाली हिंगे यांची काही दिवसांपूर्वीच शासनाने नंदुरबार येथे बदली केली होती. या बदलीला वैशाली हिंगे यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते. सोमवारी 2 नोव्हेंबर रोजी हे आव्हान खारीज करण्यात आले असून त्यांच्यासह त्रयस्थ अर्जदार दीपक कुमार गुप्ता यांचाही अर्ज फेटाळण्यात आला आहे.
येथील तहसीलदार वैशाली हिंगे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांच्या विरोधातील तक्रारी आणि गुप्ता यांनी केलेल्या तक्रारी यांच्यामुळे त्यांचा कार्यकाळ हा चर्चेचा राहिला होता.
त्याच बरोबर अनेक व्यवसायिकांच्या देखील त्यांच्या विरोधात तक्रारी वाढत होत्या. अखेर राज्य शासनाने त्यांची नंदुरबार येथील नर्मदा सरोवर येथे बदली केल्यानंतर त्यांनी मॅट कोर्ट मध्ये धाव घेतली होती आणि बदलीला स्थगिती मिळावी अशी मागणी होती. सोमवारी मात्र मॅट कोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावली.
यासह त्रयस्थ अर्जदार म्हणून अर्ज करणार्या माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांचीदेखील याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. यामुळे तहसीलदार वैशाली हिंगे पुन्हा एकदा चर्चेत आले असून अपील फेटाळले गेल्यामुळे त्यांना नंदुरबार येथे रुजू व्हावे लागणार आहे.