जळगाव, प्रतिनिधी । शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ तर खान्देशातील ४ हजार ९१६ शेतकऱ्यांकडे तीन, पाच व ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सर्व शेतकऱ्यांना दिवसा विनाव्यत्यय वीजपुरवठा उपलब्ध झाला असून वीजबिलांतून देखील मुक्तता झाली आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्यांसाठी स्वतंत्र कृषिपंप वीजजोडणी धोरणाद्वारे मोठा वेग दिला आहे. यात प्रामुख्याने कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सौर कृषिपंप योजनेचा समावेश आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी देखील या योजनेचा आढावा घेत विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहे.
पारंपरिक पद्धतीने कृषिपंपाची वीजजोडणी न झालेले व महावितरणकडे वीजजोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून पारेषणविरहित नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहे. तसेच अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी सौर कृषिपंपाच्या आधारभूत किंमतीपैकी सर्वसाधारण गटासाठी १० टक्के तर अनुसूचित जाती/जमाती गटातील शेतकऱ्यांसाठी ५ टक्के लाभार्थी हिस्सा आहे.
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत एक लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातून आतापर्यंत २ लाख ४० हजार ६१७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ९७ हजार ९ लाभार्थ्यांनी मागणी पत्राचा (डिमांड नोट) भरणा केला आहे तर ९६ हजार १९१ लाभार्थ्यांनी स्वतः निवडसूचीतील संबंधीत पुरवठादारांची निवड केली आहे. त्यातील ८५ हजार ९६३ सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यात २ हजार १०१, जळगाव जिल्ह्यात २ हजार ६८ तर धुळे जिल्ह्यात ७४७ असे खान्देशात ४ हजार ९१६ सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत. तर आवश्यक कागदपत्र जोडलेले नसणे, स्थळ तपासणीनंतर कृषिपंपाची वीजजोडणी आढळून येणे, जलस्त्रोत नसणे, विहीर किंवा कूपनलिका ६० मीटरपेक्षा खोल असणे तसेच डिमांड नोट दिल्यानंतरही लाभार्थी हिस्सा न भरणे आदी कारणांमुळे १ लाख २४ हजार ६९२ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
वीजयंत्रणेचे जाळे नसल्यामुळे व पारेषणविरहित असल्याने सौर कृषिपंपांद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. यासोबतच शेतकऱ्यांची वीजबिलातून मुक्तता झाली आहे. आस्थापित करण्यात आलेल्या सौर कृषिपंपासाठी ५ वर्ष व पॅनेलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखभालीचा खर्च देखील शून्य आहे. या योजनेची सर्व माहिती महावितरणच्या https://www.mahadiscom.in/solar/ या स्वतंत्र पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जाची सद्यस्थिती ऑनलाईन उपलब्ध आहे तसेच प्रत्येक टप्प्यावर त्याबाबत अर्जदारांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येत आहे.