मुंबई वृत्तसेवा – चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर विक्रोळी भागात एक इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याचे आणि भांडूप भागातही एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केले असून मदतीची घोषणा केली आहे. ‘मुंबईतीलचेंबूर आणि विक्रोळीमध्ये भिंत कोसळल्याने लोकांचा मृत्यू झाल्याने दुःखी आहे. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना शोकग्रस्त कुटुंबासोबत आहेत. यात जे लोक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.’ यावेळी त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन-दोन लाख रुपये आणि जखमींना 50-50 हजार रुपयांच्या मदतीचीही घोषणा केली आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनांवर महापालिका प्रशासनाच्या वतीने भूमिका मांडली आहे. “महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तीन-तीन वेळा जाऊनही लोक बाहेर निघायला तयार होत नाहीत. मग अशावेळी महापालिका किंवा एखादी यंत्रणा कारवाई करायला जाते त्यावेळी त्याला विरोध होतो. चेंबूरमधील घटनेची माहिती घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हेच सांगितलं. त्याठिकाणच्या नागरिकांना तीन-तीन वेळा जाऊन सांगण्यात आलं होतं. तुमची घरं दरडीच्या खालीच आहेत, असंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं” अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली