पुणे, वृत्तसंस्था । शहरातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आता पुण्यात लवकरच ‘वस्ती तेथे लसीकरण’ मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील रहिवाशांना घराजवळच कोरोना लस मिळेल.
ऑनलाईन नोंदणी करून कोरोना लस (Coronavirus Vaccine) घेणे अडचणीचे ठरत असलेल्या झोपडपट्टीवासियांसाठी महापालिकेकडून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी झोपडपट्टयांमध्ये राहणार्या नागरिकांना त्यांच्याच वस्तीमध्ये जाऊन लस देण्यात येईल. शहरात साडेचारशेहून अधिक झोपडपट्टया असून सुमारे आठ लाख नागरिक राहतात.
यापूर्वी ठाण्यातही अशाचप्रकारचा उपक्रम राबवण्यात आला होता. ठाणे शहरातील झोपडपट्टी परिसरात लसीकरण प्रक्रियेला वेग देण्यासाठी आता पालिकेने 4 मोबाईल लसीकरण सेंटर्सची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील झोपडपट्टी तसेच चाळीमध्ये राहणारे नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये तसेच इतर लसीकरण केंद्रावर ये-जा करणे शक्य नसणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घराजवळच लस देण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शन सुचेनेनुसार ठाणे महापालिकेच्यावतीने 4 कोविड-19 मोबाईल लसीकरण सेंटर्स सुरू करण्यात आली होती. या कोविड-19 मोबाईल लसीकरण सेंटरमध्ये 1 वैद्यकीय अधिकारी, 1 व्हॅक्सिनेटर, 2डेटा ऑपरेटर, आणि एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. शहरातील झोपडपट्टी परिसरासोबत इतर विविध ठिकाणी दररोज दुपारी 11 ते 3 या वेळेत नागरिकांना त्यांच्या घराजवळ पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. ही मोबाईल लसीकरण केंद्रे दररोज वेगवेगळ्या भागांत फिरतील.