पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील वृद्ध महिलेनेआजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. या घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरे.) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातगाव येथील राधाबाई वाघ (वय – ७२) असे मृत महिलेचे नाव असून ह्या अनेक दिवसापासून आजारी होत्या. बऱ्याच ठिकाणी त्यांनी उपचारही घेतले. मात्र आजार दुरुस्त होत नसल्याने त्या कंटाळून गेलेल्या होत्या. दि. ३० रोजी शुक्रवारी दुपारून त्या अचानक गायब झाल्या. संध्याकाळी मुलानेही शोधाशोध केली मात्र त्या आढळून आल्या नाही.
रात्रीचा अंधार झाल्याने, शोधाशोध करता आली नाही. मात्र दिलावर सरवर तडवी मच्छी पकडण्यासाठी धरणावर गेले असता, त्यांना महिलेचे प्रेत तरंगताना दिसले. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील दत्तू पाटील यांना सूचना केली. पोलीस पाटील यांनी दूरध्वनीवरून पिंपळगाव (हरे.) येथील पोलीस स्टेशनला खबर दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे, पोलीस दिलीप पाटील, डॉ. मोहित जोहरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला डॉ. जोहरे यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. सदर घटनेचा तपास सपोनि नीता कायटे करत आहे.