नवी दिल्ली, वृत्तसंस्था । देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटने थैमान घातले होते, आता ही लाट ओसरताना दिसत असून कोरोना रुग्णांची संख्याही कमी होत आहे. देशात कोरोना लसीकरणाच्या मोहीमेला आता वेग आला आहे. कोविडयोद्ध्यांनंतर आता सामान्य नागरिकांनाही कोरोनाची लस टोचण्याची मोहिम देशात सुरू झाली आहे.
एकाच दिवसांत देशात तब्बल 80 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रमही भारताने केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कंपन्यांकडूनही कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. रिलायन्सकडूनही 20 लाख कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची घोषणा करण्यात आली.
रिलायन्स सोशल फाऊंडेशनच्या प्रमुख निता अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स आणि रिलायन्सशी संबंधित सर्वच कंपन्यांतील कर्मचाऱ्याचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्समध्ये कार्यरत असलेले कर्मचारी, निवृत्त कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचंही कंपनीकडूनच मोफत लसीकरण्यात करण्यात येईल, असे निता अंबानी यांनी जाहीर केले. भारतातील काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला.
रिलायन्स फाउंडेशनच्या (Reliance Foundation) चेअरपर्सन आणि संस्थापक नीता अंबानी (Nita Ambani) यांनी यापूर्वीच कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये याबाबत माहिती दिली आहे. नीता अंबानी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना या ईमेलद्वारे लसीकरण मोहिमेसाठी नोंदणी करण्याची विनंती केली आहे. कर्मचाऱ्यांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांच्या लसीकरणाचा खर्च देखील कंपनी करणार आहे. रिलायन्स समुहामध्ये साधारण 6 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंबीय, पार्टनर कंपनींचे कर्मचारी आणि निवृत्त अशी एकूण आकडेवारी 20 लाख आहे. या सर्वांच्या कोरोना लशींचा खर्च रिलायन्स समुहाकडून करण्यात येणार आहे.