जळगाव – शहरातील प्रभाग क्र. 3, 17 सह 4 मधील नागरिकांची ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लसीकरण करवून घेण्यासाठी परिसरात केंद्रच नसल्याने इतर केंद्रांवर जाण्या-येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दमछाक होत होती. त्यामुळे या भागातील नागरिकांसह युवा ब्रिगेडियर्स फाऊंडेशनचे कार्यकर्ते अमेय राणे यांच्याकडून महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्याकडे परिसरात लसीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात सातत्याने मागणी होत होती.
महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी जळगाव शहर महानगरपालिका, एल.के. फाऊंडेशन, युवा ब्रिगेडियर्स फाऊंडेशन, जळगाव व मानराज इनोव्हेशन प्रा. लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार, दि. 10 जून 2021 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शहरातील जुन्या खेडी रोडवरील काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करून ते नागरिकांसाठी खुले केले. या केंद्र उभारणीमुळे या भागातील नागरिकांची मोठी सोय झाली असून, केंद्र सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सेवेसाठी उपलब्ध राहील.
लसीकरण केंद्र सुरू करतेवेळी प्रभाग क्र. 3 चे नगरसेवक श्री.प्रवीण कोल्हे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.रंजना सपकाळे, प्रभाग क्र. 17 च्या नगरसेविका सौ.मीनाक्षी पाटील, नगरसेवक श्री.सुनील खडके तसेच नगरसेविका पती श्री.कमलाकर बनसोडे, सौ.वानखेडे, नगरसेवक डॉ.विरन खडके यांच्यासह महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी, डॉ.रेशमा मुणोत, डॉ.मनीषा उगले, परिचारिका सुप्रिया कांबळे, मंगला तायडे, आशा स्वयंसेविका अर्चना पाटील, आशा लांडे यासह एल.के.फाऊंडेशन, युवा ब्रिगेडियर्स फाऊंडेशन, मानराज इनोव्हेशन प्रा. लि. मुंबईचे सदस्य व जळगाव शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन म्हणाल्या, की प्रभाग क्र. 3 मधील खेडी गाव, योगेश्वरनगर, वाल्मीकनगर, दिनकरनगर, तानाजी मालुसरे नगर, पीपल्स बँक कॉलनी, प्रभाग क्र. 17 मधील अयोध्यानगर, अजिंठा हौसिंग सोसायटी, शांतीनिकेतन सोसायटी, रायसोनी शाळा परिसर, ट्रान्स्पोर्टनगर, म्हाडा कॉलनी, एस.टी. वर्कशॉप, सदोबानगर, कासमवाडी, पांझरापोळ परिसर तसेच प्रभाग क्र. 4 मधील जोशी पेठ, मारुती पेठ, बालाजी पेठ, राम पेठ, विठ्ठल पेठ या भागातील नागरिकांना ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लसीकरण करवून घेण्यासाठी परिसरात केंद्रच नसल्याने इतर केंद्रांवर जाण्या-येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दमछाक होत होती व विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात माझ्याकडे अमेय राणेंसह नागरिकांकडून बर्याच दिवसांपासून केंद्र सुरू करण्याबाबत मागणी होत होती. त्यावर यथोचित विचार करून आज काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयात हे केंद्र परिसरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे. अधिकाधिक नागरिकांनी या सेवेचा लाभ घेऊन लसीकरण करवून घ्यावे. आपत्कालीन सेवा म्हणून केंद्रावर युवा ब्रिगेडियर्स फाऊंडेशनने अॅम्ब्युलन्सही उपलब्ध करून दिली आहे. तसेच परिसरात ‘मी लस घेतली आपणही घ्या’ हा संदेश इतरांना देण्याकरिता आकर्षक सेल्फी पाईंटही उभारले आहे. लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी नगरसेवक श्री.ललित कोल्हेंसह ज्या-ज्या स्वयंसेवी संघटनांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मी आभार मानते.