जळगाव – धरणगाव तालुक्यातील शेतकरी महिलेवर कोरोना बाधित झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे सव्वा महिने यशस्वी उपचार केल्यानंतर बुधवारी २ जून रोजी यशस्वीरित्या डिस्चार्ज देण्यात आला. जीवनमृत्युच्या या संघर्षात वैद्यकीय पथकाला महिलेचा जीव वाचवण्यामध्ये यश मिळाले.
धरणगाव तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकरी महिलेला कोरोनाची बाधा झाल्यानंतर तिला १६ एप्रिल रोजी एका खासगी रुग्णालयातुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिची ऑक्सिजन पातळी ७५ होती.
ऑक्सिजन सारखा कमी जास्त होत असल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली होती. अतिदक्षता विभागामध्ये तिच्यावर यशस्वी उपचार केल्या नंतर तिला ९ दिवसानंतर धोक्यातून बाहेर काढत अतिदक्षता विभागातून कक्ष क्रमांक ९ मध्ये हलविण्यात आले. पुढील १ महिना १० दिवस कक्षामध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. गेल्या ४ दिवसांपासून तिची ऑक्सिजन पातळी नियंत्रणात आली.
अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली औषध वैद्यक शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड, डॉ. शालमी खानापूरकर, डॉ. आस्था गणेरीवाल यांच्या सह कक्षातील रुपाली जोशी, प्रतिभा खंडारे, ललित सोनवणे, माधुरी टोकरे, सपना ढोले आदींनी यशस्वी उपचार केले.
बुधवारी २ जून रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी महिलेला पुष्पगुच्छ देत रुग्णालयातून निरोप दिला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास मालकर, डॉ. विजय गायकवाड, डॉ. आस्था गणेरीवाल यांच्या सह कर्मचारी वर्ग उपस्थित होते. गंभीर अवस्थेत असताना वेळेवर यशस्वी उपचार केले व प्राण वाचविल्या बद्दल महिलेसह तिच्या नातेवाईकांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले.