जळगाव – धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे साईबाबा मंदिरासमोर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार विकास भास्कर पाटील वय ४२ रा शिवदत्त कॉलनी, चंदू आण्णानगर परिसर, हे ठार झाले आहेत. आज मंगळवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना अपघाताची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, मयत विकास पाटील हे जि.प.सदस्य प्रताप पाटील यांचे नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अपघाताबाबत विकास पाटील यांच्या कुटुंबियांना माहिती कळविण्यात येवून विकास पाटील यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलस नाईक संदीप पाटील व पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील यांनी पंचनामा केला. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात येवून शून्य क्रमांकाने हा गुन्हा पाळधी पोलीसात वर्ग केला जाणार असल्याचे कर्मचारी प्रदीप पाटील यांनी सांगितले. मयत विकास पाटील यांच्या पश्चात पत्नी पुष्पांजली, मुलगा तेजस व मुलगी स्नेहल असा परिवार आहे. तेजस याचे शिक्षण पूर्ण झाले असून तो खाजगी कंपनीत नोकरी करतो. तर स्नेहल ही बारावीला शिकत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यावर विकास पाटील यांचे मूळ सनफुले येथील नातेवाईकांनीही जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.