जळगाव प्रतिनिधी । जळगावातील शिवाजीनगर भागात खाद्यपदार्थांच्या गोडाऊनला आग लागण्याची घटना 15 मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात आग लागल्याची नोंद करण्यात आली आहे.
निमखेडी रोड येथील जैन पाईप फॅक्टरी येथील रहिवासी अरुणकुमार लक्ष्मीनारायण जाजू (वय ४६) यांची शिवाजीनगर येथील महापालिका आयुक्त यांच्या बंगल्या शेजारी गोडावून आहे. या गोडावूनमध्ये ते सिगारेटसह खाद्यपदार्थांचा माल ठेवतात. या गोडावूनला १५ मे रोजी सायंकाळी ३.४५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीबाबत याच परिसरात राहत असलेल्या अरुणकुमार लक्ष्मीनारायण जाजू यांच्या बहिणी निर्मला हिस माहिती मिळाली. तिने आगीच्या घटनेबाबत भाऊ अरुणकुमार जाजू यास फोनवरुन कळविले. अरुणकुमार जाजू घटनास्थळी पोहचले असात, आगीत गोडावूनमधील ४२ लाखांच्या सिगारेट व १० लाखांचे बिस्कीटसह इतर खाद्यपदार्थ असा एकूण ५२ लाखांचा माल खाक झाला आहे.
याप्रकरणी अरुणकुमार जाजू यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रहिवारी पहाटे ४.४५ वाजेच्या सुमारास शहर पोलीस स्थानकात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.