जळगाव – महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज शाहू महाराज हॉस्पिटल येथील लसीकरण केंद्रास भेट दिली. लसीकरणासाठी या केंद्रावर नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आल्यानंतर महापौर व उपमहापौर यांनी येथे जाऊन पाहणी केली व नागरिकांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले.
यावेळी महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, नागरिकांनी लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन ला प्राधान्य द्यावे. जेणेकरून लसीकरण केंद्रांवर गर्दी होणार नाही व सर्व लसीकरण हे सुरळीतपणे सुरू राहील. इतर ठिकाणांपेक्षा लसीकरण केंद्रावरच जास्त गर्दी आढळून येत असल्याने कोरोना चा धोका वाढायला नको, त्यामुळे आपण सर्वांनी संयमाने प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील हेदेखील उपस्थित होते. ते म्हणाले की ,सध्या लसींचा तुटवडा असल्याने लसीकरणास विलंब होत असून नागरिकांना गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. परंतु ज्याप्रमाणे लस प्राप्त होत आहे, त्याप्रमाणे सर्व नागरिकांना लस दिल्या जात आहे. त्याबरोबरच ज्या नागरिकांनी कोविशिल्ड या लसीचा प्रथम डोस घेतला असेल , त्यांनी कोवीशील्ड लसीचाच दुसरा डोस घ्यावा आणि ज्यांनी कोव्हॅक्सिचा पहिला डोस घेतला असेल त्यांनी कोव्हॅक्सीन चाच दुसरा डोस घ्यावा. प्रथम डोस वेगळ्या लसीचा व दुसरा डोस वेगळ्या लसीचा घेऊ नये. तसेच लस घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ला प्राधान्य देऊन लसीकरण केंद्रांवर गर्दी टाळण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.