जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांना दिली जाणारी उपचार पद्धती खूप चांगली आहे. येथील कोविडबाधित रुग्णांसाठी व्यवस्थापन उत्तम दिसत असल्याचे प्रतिपादन जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवार दि. २९ एप्रिल रोजी सकाळी महापौर महाजन यांनी कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेतली. भेटीत त्यांनी रुग्णालयातील व्यवस्थापन कसे चालते याची माहिती घेतली. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांनी वॉर्डांची पाहणी केली. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी रुग्ण प्रवेश प्रक्रिया, त्यांना दिली जाणारी वैद्यकीय व रुग्णालयीन सेवा, भोजन सेवेची माहिती दिली. भोजन कक्षासाठी आहारतज्ज्ञांचा समावेश असलेली समिती कार्यरत आहे. जीएमसीच्या उत्तम सेवेमुळे गरीब लोकांना आर्थिक झळ बसत नाही. केवळ अत्यवस्थ व गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल असतात, असेही डॉ. रामानंद यांनी सांगितले.
यावेळी महापौर यांचे स्वीय सहाय्यक ललीत धांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास मालकर उपस्थित होते.